अमरावती : येथील बहुचर्चित उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) तपासणार आहे. याप्रकरणी अमरावतीपोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली असून, या आरोपींना एनआयएच्या ताब्यात देण्यात आले आहे. आता सातही आरोपींना बुधवारी मुंबई येथील न्यायालयात हजर करून पुढील तपास एनआयए करणार असल्याची माहिती आहे.
उमेश कोल्हे यांच्या हत्येच्यावेळी आरोपींकडून वापरण्यात आलेली दुचाकी ही सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आली आहे. मात्र, उदयपूर येथे कन्हैयालाल तर, अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या या दोन्ही घटनांमध्ये साम्य असल्याचा प्राथमिक अंदाज एनआयएने वर्तविला आहे. त्यामुळे आरोपींनी कोल्हे यांची हत्या करून पसार हाेण्यासाठी वापरलेल्या दुचाकीची कागदपत्रे तपासली जाणार आहेत.
विशेषत: या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असलेल्या शेख इरफानच्या ‘रहेबर’ या सामाजिक संस्थेचे कनेक्शन आंतरराष्ट्रीय स्तरावर तर नाही ना, या दिशेने एनआयए तपासाची चक्रे फिरवणार आहे. ‘रहेबर’ला कोरोना काळात ४० ते ४५ लाखांचे फंडिंग झाले. हा निधी अमरावती, राज्य, देश वा देशाबाहेरून मिळाला का, या पैशाचे बँकिंग झाले का, या पैशाचे ऑडिटिंग कोणी केले, या दिशेने तपास करणार आहे. अमरावतीत रहेबर संस्थेची बँक खाती कुठे-कुठे आहेत, याची चाचपणी सुरू आहे.
कोल्हे हत्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
उमेश कोल्हे हे २१ जूनरोजी रात्री १०.३० वाजेच्यासुमारास मेडिकल बंद करून दुचाकीने घराकडे जात असताना, आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. दरम्यान, काही अंतरावर कोल्हे यांचे वाहन आरोपींनी अडविले आणि चाकूने वार केला. ही घटना न्यू हायस्कूल बँक ऑफ बडोदाच्या बाजूकडील गल्लीत झाली. नेमके याच गल्लीच्या दिशेने असलेल्या न्यू हायस्कूलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. हे सीसीटीव्हीचे फुटेजही एनआयएने ताब्यात घेतल्याची माहिती आहे.