अमरावती : महापालिकेच्या आरक्षित जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी एका महिलेसह पाच जणांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. झोन १ चे शाखा अभियंता आनंद जोशी यांनी याबाबत ११ फेब्रुवारी रोजी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली होती. महापालिकेच्या विकास योजना अर्थात डीपीमध्ये शहरातील काही जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्याच मालिकेत मौजे म्हसला येथील तपोवननजीकची गोविंदनगर येथील सर्व्हे क्रमांक २२/१९ व २३/ १ हे भूखंडदेखील आरक्षित आहेत. त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकाम करण्यात आले. मात्र, अलीकडे एका महिलेकडून होत असलेल्या नव्या बांधकामाबाबत महापालिकेच्या रामपुरी कॅम्प झोनकडे तक्रार करण्यात आली.
गोविंदनगर येथील रहिवाशांच्या तक्रारीच्या अनुषंगाने झोन १ चे अभियंता आनंद जोशी यांनी स्थळ पाहणी केली. तक्रारकत्यांचे बयाण नोंदवून घेतले. महापालिकेच्या आरक्षित जागेवर ज्या महिलेने बांधकाम सुरू केले. त्या महिलेला २० डिसेंबर २०२२ रोजी बांधकाम त्वरित बंद करण्याची नोटीस देण्यात आली. मात्र बांधकाम न थांबविल्यामुळे पुन्हा १ व ३ फेब्रुवारी रोजी अनुक्रमे दुसरी व तिसरी नोटीस देण्यात आली. मात्र, तिसऱ्या नोटीसनंतरही बांधकाम न थांबविल्यामुळे जोशी यांनी तक्रार नोंदविली. त्या महिलेसह अनधिकृत बांधकाम करणाऱ्या रामवतार मिश्रा, नंदू अवधूत गायगोले, जितेंद्र झटाले व गणेश चौबे (सर्व रा. अमरावती) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
मध्यस्थांकडून फसवणुकीची शक्यता
अनेकदा काही मध्यस्थांकडून डीपीत आरक्षित असलेल्या जागादेखील विक्रीला आहेत, असे ठामपणे सांगितले जाते. नकाशात डीपी असे नमूद असताना तो डीपी रोड असल्याची थाप मारली जाते. प्रसंगी खरेदीदेखील नोंदणीकृत केली जाते. असाच काहीसा प्रकार गोविंदनगर येथील प्लॉट घेणाऱ्यांशी झाल्याची माहिती हाती आली आहे.
महापालिकेच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकाम थांबविण्याबाबत तीनदा नोटीस बजावल्या. मात्र, तरीही संबंधितांनी काम थांबविले नाही. त्यामुळे गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत.
- भूषण पुसतकर, सहायक आयुक्त, झोन १