शेतकरी संतप्त : पोलिसांना पाचारण, मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहातील प्रकार अमरावती : एका संस्थेच्यावतीने शहरात शेतकऱ्यांसाठी आयोजित एका मार्गदर्शनपर शिबिरात आयोजकांनी शेतकऱ्यांकडून विनापावती प्रत्येकी एक हजार रूपये घेतले. यावर काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतल्याने आयोजक आणि सहभागी शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान काही शेतकरी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी देखील यात हस्तक्षेप केल्याने काही वेळ तणावजन्य स्थिती उदभवली होती. मात्र, गाडगेनगर पोलिसांनी योग्य वेळी मध्यस्थी केल्याने हे प्रकरण निवळले. हा प्रकार रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान स्थानिक मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात घडली. ‘सुवर्ण कोकण समर्थ महाराष्ट्र’नामक यासंस्थेच्यावतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शेळी-मेंढीपालन, सेंद्रीय शेतीवर आधारित एक दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. एका खासगी चॅनलवरून याशिबिराची जाहिरातही करण्यात आली होती. उपरोक्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब हे या कार्यशाळेचे आयोजक आहेत. कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून सेंद्रीय शेतीतज्ज्ञ दीपक नरवडे, पारनेर येथील इब्राहीम खान हे उपस्थित होते. संपूर्ण विदर्भातील तब्बल १३५ शेतकरी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. प्रत्येक सहभागी शेतकऱ्याकडून कार्यक्रम स्थळाच्या दारावरच एका साध्या वहीत नोंद घेऊन प्रत्येकी हजार रूपयांची वसुली केली जात होती. बऱ्याच शेतकऱ्यांनी ही रक्कम दिली होती. मात्र, अजय सोने नामक शेतकऱ्यांनी पैसे स्वीकारण्याच्या या प्रक्रियेवर आक्षेप घेतला. सभागृहाच्या द्वारावर पैसे घेऊन नोंदी करणाऱ्या दीपक नरवडे यांना याबाबत विचारणा केली आणि पैसे घेताना पावती का दिली जात नाही, असा जाब विचारला.पावती देण्यास नकार का?अमरावती : शिवाय शिबिर आयोजित करताना पोलीसांसह जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली होती काय, संस्थेचे बॅनर, पोस्टर्स का लावले नाहीत, अशी प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, आयोजक या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊ शकले नाहीत. काही वेळातच याठिकाणी अन्य शेतकऱ्यांसह शिवसेना व काँग्रेस या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची गर्दी जमली. आयोजकांपैकी एक असलेल्या दीपक नरवडे यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. तणाव वाढत असलेला पाहून गाडगेनगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक पुंडे त्यांच्या ताफ्यासह विमलाबाई देशमुख सभागृहात पोहोचले. एनएसयूआयचे बडनेरा विधानसभा प्रमुख समीर जवंजाळ, शिवसेनेचे नगरसेवक भारत चौधरी हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी अन्य आयोजक अमित तायडे यांना याबाबत विचारणा केली. पुन्हा वाद उफाळून आला. वरूड तालुक्यातील पाच शेतकऱ्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करीत आयोजकांकडून पैसे परत घेतले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून सर्वांना शांत केले व चौकशीसाठी नरवडे यांना बोलविण्यात आले होते. सदर प्रकरणात शेतकऱ्यांची गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती असून सदर प्रकरण पोलिसांनी तपासात ठेवले आहे. (प्रतिनिधी)आम्ही टीव्हीवरून जाहिरात पाहून स्वत:च येथे आलो. चांगले मार्गदर्शन मिळाले. कार्यशाळेसाठी प्रत्येकी हजार रूपये घेणार असल्याची माहिती यापूर्वीच देण्यात आली होती.- विलास देशमुख, शेतकरी, धामणगाव रेल्वेबॅनर्स, ओळखपत्राशिवाय कार्यशाळा‘सुवर्ण कोकण समर्थ महाराष्ट्र’या संस्थेच्यावतीने आयोजित या कार्यशाळेचे कार्यक्रमस्थळी कोणतेही बॅनर, पोस्टर्स नव्हते. शेतकऱ्यांकडून पैसे घेण्यासाठी नेमलेल्या प्रतिनिधींजवळ कोणतेच ओळखपत्र देखील नव्हते, हे विशेष.
शेतकरी कार्यशाळेत अनधिकृत वसुली
By admin | Published: April 17, 2017 12:03 AM