अमरावती - विदर्भातील भीमक राजाची नगरी रुख्मिणीचे माहेरघर कोंडण्यपूर येथे शारदीय नवरात्रोत्सव घटस्थापनेपासून सुरू झाला. रुख्मिनीची कुलस्वामिनी म्हणून भागवतात उल्लेख असलेली येथील अंबिका देवी आहे. नवरात्रीनिमित्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून येथे ११०१ घटांवरील ज्योती लावण्यात आल्या आहेत. भीमक राजाच्या नगरीत हे मंदिर अतिशय पुरातन काळापासून आहे. याच मंदिरातून रुख्मिणीचे वासुदेव ब्राह्मणांच्या हातानी द्वारकेला पत्र पाठविले होते. ते श्रीकृष्णाच्या हाती गेल्यावर श्रीकृष्ण ताबडतोब रथमार्गे कोंडण्यपुरात दाखल झाला. रुख्मिणीला लग्नाची हळद लागली असताना प्रथेनुसार अंबिकेचे दर्शन घेण्यास ती येथे आली आणि त्यावेळी श्रीकृष्णाने याच मंदिरातून अंबिकेच्या साक्षीने रुख्मिणीचे हरण केले. देवीवर रुख्मिणीची असीम भक्ती असल्यामुळे नवरात्रीत येथे दिवसातून चार वेळा आरती केल्या जाते. अंबिकेच्या संकल्पासाठी येथे २४ तास नऊ दिवस अखंड ज्योती लावण्यात आल्यात. नवमीला हजारो भाविक ज्योती विसर्जनासाठी वर्धा नदीच्या घाटावर जातात. दरवर्षी येथे दोन नवरात्र असतात. अश्विन नवरात्र आणि चैत्र नवरात्र. त्यावेळीपण अशीच गर्दी येथे राहते. हे मंदिर अतिशय पुरातन असून अंबिकेची सुंदर मूर्ती आह येथील उत्खननात बºयाच पुरातन दस्तावेज मिळाले असून सरकारच्या पुरातन विभागात व भागवतात याचा उल्लेख आहे, अशी माहिती येथील मंदिराचे व्यवस्थापक भैयासाहेब ठाकरे यांनी सांगितले.
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त अखंड ज्योतींनी कोंडण्यपूर उजळले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 6:49 PM