- गणेश वासनिक अमरावती : वाघ व अन्य वन्यजीव रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडत असल्याने यापुढे नॅशनल हायवे निर्माण करताना वन्यजीवांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागणार आहे. वनक्षेत्रातून जाणा-या राष्ट्रीय महार्गावर किमान दोन किमी लांबीचे भुयारी मार्ग (अंडरपास) निर्माण करण्याची सक्ती राज्याच्या वन विभागाने केली आहे. रस्ते निर्मितीचे प्रस्ताव सादर करताना भुयारी मार्ग असल्याशिवाय परवानगी मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. वनसंवर्धन अधिनियम १९८० नुसार वनक्षेत्रातून राष्ट्रीय महामार्ग रस्ते निर्मिती करताना वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या भ्रमणमार्गावर अंडरपास निर्माण करणे बंधनकारक आहे. वनविभागाचे उपवनसंरक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना संयुक्तपणे घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी करावी लागणार आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्ग रस्ते निर्मितीत संबंधित अधिकाºयांना वन्यजीवांचे भ्रमण मार्ग शोधावे लागतील. रस्ते निर्मितीत वन्यजीवांच्या सुरक्षेची काळजी घेण्याबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकारी हे राज्य शासनाकडे पाठवतील. राज्याच्या वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एन. रामबाबू यांनी २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाºयांना पत्र पाठविले आहे. असे असेल नवे भुयारी मार्गवनक्षेत्र अथवा राखीव जंगलातून राज्य व राष्ट्रीय महामार्ग निर्माण करताना वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी दोन किमी लांबीचे अंडरपास तयार करावे लागेल. या अंडरपासची खोली ३ मीटर तर, रूंदी ४ मीटर असेल. जंगलाच्या स्थितीनुसार अंडरपास निर्माण करावा लागेल. किमान दोन किमी लांबीचा भुयारी मार्ग निर्माण करावा लागणार आहे. वनक्षेत्रातील रस्ते निर्मितीच्या प्रस्तावास नकाशात अंडरपास नसल्यास परवानगी मिळणार नाही, ही बाब वनविभागाने स्पष्ट केली आहे. वन्यजीवांचे भ्रमण मार्ग बाधित होऊ नयेवन्यजीवांचे भ्रमणमार्ग बाधित होणार नाही, याची दक्षता वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाला घ्यावी लागणार आहे. वनक्षेत्राची परिस्थिती लक्षात घेता भुयारी मार्ग निर्माण करावे लागतील. ते दोन किमीपेक्षा कमी असणार नाही. वनक्षेत्रातील वाघ व अन्य वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी अंडरपास असणार आहे.
वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी नॅशनल हायवेवर अंडरपास, वन विभागाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2020 8:10 PM