३१ मार्चपर्यंत खर्च करता येणार नाही
अमरावती : प्राथमिक शाळा सुरू होणार नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गणवेश वाटप होण्याची शक्यता दिवसेंदिवस मावळत आहे. एका गणवेशासाठी प्राप्त निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करावा लागणार आहे. त्यातच आता गणवेश खरेदी प्रक्रियेत ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता आली आहे. नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्यानंतर इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यानुसार समग्र शिक्षा अभियानांतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळण्याच्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापन समितीस्तरावरुन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यासाठी निधी वेळेत उपलब्ध करण्यात आला. एकूण मागणीच्या ५० टक्के निधी मंजूर केल्याचे पत्र शासनाने दिले. प्रत्येक विद्यार्थ्याला यंदा एकच गणवेश पुरविण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिकांच्या मंजूर आर्थिक तरतुदींपैकी जिल्हा परिषद व महापालिकास्तरावर शिल्लक रक्कम लक्षात घेऊन गणवेश देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालकांनी १३ नोव्हेंबरला दिले. या आदेशाला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असताना कारवाई संथगतीने होत आहे. अद्यापही शासन निधी शाळास्तरावर पोहोचलेला नाही.
बॉक्स
शाळांपुढे अडचणी
शैक्षणिक वर्ष संपले तरी काही महिन्याचा कालावधी असताना शाळा सुरू करण्यासंदर्भात अनिश्चित आहे. विद्यार्थ्यांना एकच गणवेश दिला जाणार, याकरिता अद्याप शाळांना रक्कम मिळालेली नाही.
सोबतच आयएसआय मार्क असलेला गणवेशाचे कापड कुठून आणायचे, हा प्रश्न आहे. यामुळे गणवेशावर शासनाचे धोरण संभ्रमित करणारे आहे. या सर्व बाबींवर स्पष्टपणे सूचना मिळणार नाही तोपर्यंत गणवेशाचा पुरवठा करणे कठीण आहे.