अंजनगाव सुर्जी : वटपौर्णिमेला महिला आपल्या पतीचे आयुष्य वाढावे, सातजन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. परंतु अंजनगाव सुर्जी शहरातील डीपी.रोड तीन वर्षांपासून निर्माणाधीन असल्याने आणि अपूर्ण कामामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या घरातील नागरिकांना धुळीचा त्रास वाढल्याने चार महिन्यांपासून येथील नागरिकांनी महत्त्वाचा डीपी.रोड दोन्हीकडून टीन लावून पालिका प्रशासनाला बंद ठेवायला भाग पाडले. तरीही रस्त्याच्या कामात कुठलीच प्रगती होत नसल्याचे बघून अखेर वटपौर्णिमेच्या पवित्र दिवशी डीपी रोडवरील त्रस्त महिलांनी रस्त्यावर बेशरमचे झाड लावून पालिका प्रशासनाचा निषेध केला.
शहरातील डीपी रोड अत्यंत महत्त्वाचा असून, या रस्त्यावरून प्रचंड वाहतूक होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. परंतु चार महिन्यांपासून रस्ता बंद असल्याने शहरातील नागरिकांना इतर मार्गावरून जावे लागत आहे. व्यवसाय ठप्प झाले. डीपी रोड परिसरातील नागरिकांनी दोन वर्षे धुळीचा त्रास सहन केला. वारंवार पालिका प्रशासनाला निवेदन दिले. तरीही रस्त्याच्या कामात कुठलीही प्रगती होत नसल्याचे बघून गुरुवारी स्थानिक महिलांनी बेशरमचे झाड लावून प्रशासनाचा निषेध नोंदविला. यावेळी डीपी रोडवर राहणाऱ्या सर्व महिला उपस्थित होत्या. सीमा बोके, रुपाली शेरकर, सारिका मानकर, छाया सपाटे, स्वाती मानकर, करुणा बाजड, गायत्री तुरखडे, शीतल बोके, अर्चना तूरखडे, सविता पाठक उपस्थित होत्या.