राष्ट्रसंताच्या महासमाधी परिसरातील वटवृक्षाची लाभते सोबत
गुरुकुंज (मोझरी) : अमित कांडलकर
राष्ट्रसंताची महासमाधी प्रत्येक भक्तासाठी ऊर्जाकेंद्र आहे. या परिसरात दररोज नित्यनियमाने संघटित होऊन जीवनरहस्याचा सार संत महात्म्याच्या आध्यात्मिक लिखाणात शोधून कथनाच्या माध्यमातून आत्मबोध निर्माण करण्याचा अनोखा पायंडा येथील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या सांजमैफलीत पाडला. त्यांचा हा रोजचा नित्यक्रम झाल्याचे गुरुकुंजात पाहायला मिळते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधी परिसरात रोजच ज्येष्ठ नागरिकांचा मोठा गोतावळा पाहायला मिळतो. पहाटेच्या वेळी महिला भगिनी मोठ्या संख्येने दर्शन घेताना निदर्शनास येतात, तर सायंकाळी ज्येष्ठ समवयस्क एकाच ठिकाणी विशेषतः सामाजिक अंतर राखून बैठक घेऊन बसलेले आवर्जून दिसून येतात. परिसरात येणाऱ्या भाविकांना या दृश्याचे नेहमीच कौतुक! कारण आजच्या धकाधकीच्या आधुनिक युगात अशी सांजमैफल आणि तीही घरातील ज्येष्ठश्रेष्ठ वयोवृद्ध व्यक्तीची खूप कमी पाहायला मिळते, हे विशेष. येथील अनेक ज्येष्ठ नागरिक शासकीय, प्रशासकीय सेवा करून निवृत्तीनंतर आध्यात्मिक सांगड घालून आनंदी निरोगी जीवन व्यतीत करतात. त्यांचा नियमाचा शिरस्ता ठरलेला आहे. रोज महासमाधी स्थळावर नतमस्तक होणे हा त्यातील एक भाग आहे. सहभागी सदस्यांनी ठरवून ठेवलेल्या रोजच्या वेळी हजर व्हायचे. आधी परिसरातील देश-विदेशातील चालू घडामोडींचा आढावा घ्यायचा. मग कौटुंबिक सुखदुःख जाणून घ्यायचे. आपल्या आयुष्यात रक्ताचे नातलग दूर असले तरी एकटेपणा अजिबात जाणवू न देता नियमित राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची लिखाण केलेल्या ग्रामगीता ग्रंथातील अध्याय वाचन करून त्याचा अर्थ सांगितला जातो. त्याचबरोबर इतर संतांच्या ग्रंथ ओवीचे वाचन व त्याच्या अर्थ मांडण्याचा प्रयत्न या सांजमैफलीत उपस्थित प्रत्येक ज्येष्ठ नागरिक करताना दिसून येतो. यातून अनोखी ऊर्जा प्राप्त होते. अधिक सक्षमपणे जगण्याची ऊर्मी या आध्यत्मिक साहित्यामधून प्राप्त होते, असे उपस्थित ज्येष्ठ नागरिक आवर्जून सांगतात. आजच्या बदलत्या जीवनशैलीत अशा प्रकारची आध्यात्मिक सांजमैफल खरोखरच अनोखी अन् लक्षवेधी आहे.
--------------------------------------------
यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांसोबत ‘लोकमत’ने संवाद साधला असता महासमाधी परिसर ऊर्जास्थान असून, या ठिकाणी मुबलक वृक्षसंपदा आहे. त्यामुळे या ठिकाणी काही वेळ बसलो तरी मोठ्या प्रमाणात प्राणवायू मिळतो. सोबतच आध्यात्मिक शांती मिळते, असे मत हांडे गुरुजींनी व्यक्त केले.
300721\20210725_181050.jpg
batmi photo