अमरावती : राज्यात एकाही विद्यापीठाकडे बनावट राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट), राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) अथवा एम.फिल प्रमाणपत्र पडताळणीची स्वतंत्र यंत्रणा नाही. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील कला, विज्ञान महाविद्यालयाचे सहयाेगी प्राध्यापक सुरेंद्र चव्हाण यांचे नेट पात्रता परीक्षा प्रमाणपत्र ‘फेक’ असल्याचे यूजीसीने २७ ऑक्टोबर २०२३ रोजी जाहीर केले. त्यामुळे बनावट प्रमाणपत्र आणा नि कलेक्टरसमान गलेलठ्ठ वेतनाची नोकरी मिळवा, असाच काहीसा प्रकार उच्च शिक्षण क्षेत्रात सुरू आहे.
प्राध्यापक असो वा सहयोगी प्राध्यापक या पदाला विद्यापीठाकडून मान्यता घेणे अनिवार्य आहे. त्यानंतर संबंधित महाविद्यालयात ही भरतीप्रक्रिया राबविली जाते. मुलाखतीसाठी विद्यापीठातून एक्स्पर्ट अधिकारी नेमले जातात; पण संबंधित प्राध्यापकांचीशैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र खरे की खोटे? याबाबतची मान्यतेपूर्वी शहानिशा एक्स्पर्ट अधिकाऱ्यांनी करावी, असे अपेक्षित असते.मात्र नेट/सेट, एम.फिलच्या प्रमाणपत्राची कशी, कोठे पडताळणी करावी यासंदर्भात यूजीसी अथवा राज्य शासनाकडून गाइडलाइन नाही.