अमरावती : देशात उच्चशिक्षणामध्ये झालेली वाढ कौतुकास्पद आहे. आज आणि उद्याच्या समाजनिर्मितीसाठी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची असून, त्याअनुषंगाने शिक्षणाची पायाभरणी करावी, असे आवाहन शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ३५ व्या दीक्षांत समारंभात त्यांनी बीजभाषण केले.दीक्षांत समारंभाच्या व्यासपीठावर कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख, प्राचार्य एफ.सी. रघुवंशी, परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख, लेखा व वित्त अधिकारी भारत कराड, उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक डी.व्ही. जाधव, अधिष्ठाता डी.डब्लू. निचित, एस.आर. देशमुख, एम.पी. काळे, पी.ए. वाडेगावकर आदी उपस्थित होते. डॉ. के. कस्तुरीरंगन पुढे म्हणाले, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने समाजाभिमुख शिक्षणक्रमावर भर द्यावा. उच्चस्तरावरील संशोधन करून योगदान दिल्यास हीच खरी संत गाडगेबाबांना आदरांजली राहील. विद्यापीठाचा दृष्टिकोन हा विद्यार्थिकेंद्रित असावा. प्रशिक्षित व्यावसायिक, आदर्श नागरिक, शैक्षणिक नेतृत्व, वैश्विक उद्योजक आणि आव्हानाचे संधीमध्ये रूपांतर करू शकेल, असे विद्यार्थी घडविले पाहिजे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विशेष व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ला पुढे घेऊन जात आहे. आजचा विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भ आहे. त्याला वैश्विक आव्हान खुणावतेय. त्यावर सर्जनशीलता, प्रतिभेने स्वार व्हा, असे त्यांनी आवूर्जन सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानव अंतरिक्ष उड्डाण कार्यक्रम ‘ज्ञानगंगा’ जाहीर केला असून, सन २०२२ मध्ये भारतीय अवकाशात झेपावेल. यातून देशाचा आत्मविश्वास वाढेल आणि बळ मिळेल, असा विश्वास डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी केले. संचालन हेमंत खडके व अल्का गायकवाड यांनी केले.
गुणवत्तेत मुली सरस३५ व्या दीक्षांत समारंभात सुवर्ण, रौप्यपदकांसह रोख पारितोषिकांमध्ये मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या. त्यांनी १४९ पदके, पारितोषिकांपैकी १२७ पदके, पारितोषिके मुलींनी पटकाविली. बहि:शाल विद्यार्थिनी सोनाली दामोदर खडसे हिने सहा सुवर्ण व एक पारितोषिक पटकाविले. ४० हजार २९९ विद्यार्थी सन्मानितसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ३५ व्या दीक्षांत समारंभात ३७८ संशोधकांना आचार्य पदवी, १०५ सुवर्णपदके, २२ रौप्यपदके, २४ रोख पारितोषिके आणि ३९ हजार ७३० विद्यार्थ्यांना पदवी, तर ४० विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करून सन्मानित करण्यात आले.