अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी २०२० नियमित प्रवेशित विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षांना बुधवारपासून सुरळीतपणे प्रारंभ झाला. ऑनलाईन परीक्षा ६ जूनपर्यंत घेण्यात येतील, असे नियोजन करण्यात आले आहे. विधी, अभियांत्रिकी व फार्मसीच्या सुमारे ८५०० विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी परीक्षा दिली.
विद्यापीठ संलग्नित ३८४ महाविद्यालयांच्या नियंत्रणात पाचही जिल्ह्यांत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहे. विद्यार्थी घरी बसून मोबाईल, लॅपटॉप अथवा डेस्कटॉपवरून ही परीक्षा देऊ शकतील, अशी सुविधा विद्यापीठाने उपलब्ध केली आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी महाविद्यालयात प्रश्नपत्रिका ऑनलाईन पाठविली जात असून, ही प्रश्नपत्रिका महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना गुगल फार्मवर पाठविली जाते. त्याअनुषंगाने पहिल्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या तांत्रिकी त्रुट्या न उद्भवता ऑनलाईन परीक्षा व्यवस्थितपणे आटोपल्या. सकाळी १० ते ११, दुपारी १२ ते १, २ ते ३ आणि ४ ते ५ अशी चार शिफ्टमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली आहे. दुपारी ४ ते ५ या दरम्यान विधी पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले होते. विधी अभ्यासक्रमाचे ५००, अभियांत्रिकी ६ हजार, तर फार्मसीचे २ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यावेळी विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेसाठी कोणतीही बाह्य यंत्रणा अथवा एजन्सी नियुक्त न करता या परीक्षांचे नियोजन केले आहे. त्याकरिता परीक्षा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे परिश्रम महत्त्वाचे ठरले आहे.
-------------------------
अशी झाली पहिल्या दिवशी ऑनलाईन परीक्षा
- अभियांत्रिकी सीजीएस, सीबीसीएस (तिसरे सत्र)
- विधी अभ्यासक्रम ५ वर्षीय (तिसरे, पाचवे, सातवे, नववे सत्र)
- विधी अभ्यासक्रम ३ वर्षीय (तिसरे, पाचवे सत्र)
- फार्मसी ( तिसरे, पाचवे, सातवे सत्र)
---------------------
आजपासून ऑनलाईन प्रात्यक्षिक परीक्षा
६ ते ११ मे या दरम्यान परीक्षा न झालेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून वेळापत्रक कळविले जाणार आहे. या प्रात्यक्षिक परीक्षेत यापूर्वी ज्यांनी परीक्षा दिली नाही, त्यांना संधी मिळणार आहे. तसेच १२ मे पासून बी.ए.,बी.कॉम. शाखेच्या ऑनलाईन परीक्षांना प्रारंभ होणार आहे.
-------------------
बुधवारी पहिल्याच दिवशी चार शिफ्टमध्ये ऑनलाईन परीक्षा पार पडल्या. कोणतीही तक्रार अथवा तांत्रिक अडचणी उद्भवल्या नाहीत. ६ जूनपर्यंत परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ. अमरावती विद्यापीठ