अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात इंजिनीअरिंंग मेकॅनिक्स या विषयाचे पेपरफूट प्रकरण राज्य विधिमंडळात पोहोचले आहे. काँग्रेस आ. विजय वड्डेटीवार, आ. यशोमती ठाकूर व आ. वीरेंद्र जगताप यांनी दाखल केलेली लक्ष्यवेधी सूचना विधिमंडळाने मान्य केली आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाने माहिती पाठविण्यासाठी लगबग चालविली आहे.
विद्यापीठात इंजिनीअरिंग मॅकेनिक्स या विषयासह अन्य चार पेपर ‘लीक ’ झाले आहे. पोलीस त्या दिशेने तपास करीत असले तरी काँग्रेसच्या आमदारांनी हा प्रश्न थेट विधिमंडळात पोहचविल्यामुळे अमरावती विद्यापीठाने याप्रकरणी आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पाठविण्यासाठी बुधवारी प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांच्या दालनात बैठकांचे सत्र सुरू असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे. पेपरफूट प्रकरण ४ जून रोजी पार पडलेल्या सिनेट सभागृहातही गाजले आहे.
आ. यशोमती ठाकूर या अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सदस्य देखील आहेत. सिनेटमध्ये याप्रकरणी घमासान झाल्यानंतर कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता हे प्रकरण चौकशीअंती पोलिसात देण्याचा निर्णय सिनेट सभेत घेतला होता. त्यानुसार परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आशिष राऊत, निखिल फाटे आणि ज्ञानेश्वर बोरे या तिघांना याप्रकरणी आरोपी करण्यात आले होते. त्यापैकी आशिष राऊत, निखिल फाटे या दोन्ही आरोपींना न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. तर, ज्ञानेश्वर बोरे हा लिपीक अद्यापही पसार आहे. आ. वडेट्टीवार, आ. ठाकूर व आ. जगताप यांनी सादर केलेली १०५ क्रमांकाची लक्ष्यवेधी सूचना मान्य करण्यात आली आहे.