अमरावती : संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळांवर आवश्यक पात्रता नसलेल्या प्राध्यापकांचे नामनिर्देशन करण्यात आल्याचा आक्षेप 'नुटा'च्या पदाधिका-यांनी घेतला आहे. यासंदर्भात कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याकडे आक्षेप याचिका दाखल केली आहे.
विविध अभ्यास मंडळांवरील नामनिर्देशनासाठी १३ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली होती. यात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदींचा वापर करून सहा प्राध्यापकांचे नामनिर्देशन कुलगुरूंनी केले होते. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ मधील ४० (२) (ब) (२) च्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त पदव्युत्तर प्राध्यापकांमधून दोघांना विविध अभ्यास मंडळांवर नामनिर्देशित केले आहे. मात्र, त्यासाठीची आवश्यक पात्रता नसतानासुद्धा ब-याच प्राध्यापकांची वर्णी लागली आहे. अपात्र प्राध्यापकांचा यादीतील समावेश प्रश्नचिन्ह निर्माण करतो, असे 'नुटा'ने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. संबंधित विषयातील पदव्युत्तर अध्ययनक्रम देऊ करणा-या संलग्न महाविद्यालयांमधील किंवा मान्यताप्राप्त परिसंस्थांमधील किंवा पदव्युत्तर केंद्रामधील मान्यताप्राप्त पदव्युत्तर प्राध्यापक अशी नामनिर्देशनासंदर्भातील तरतूद महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ४० (२) (ख)(२) मध्ये अधोरेखित केली आहे.
या तरतुदीप्रमाणे ज्या संलग्न महाविद्यालयांमध्ये संबंधित विषयातील पदव्युत्तर अध्ययनक्रम आहेत व त्यांना शिकवणारे पदव्युत्तर प्राध्यापक आहेत, अशाच संलग्न महाविद्यालयांतील दोन मान्यताप्राप्त प्राध्यापकांचे नामनिर्देशन अपेक्षित होते, असे निवेदनात 'नुटा'ने नमूद केले आहेत. कित्येक संलग्न महाविद्यालयांमध्ये संबंधित विषयाचे पदव्युत्तर अध्ययनक्रम नाहीत तसेच या विषयांचे प्राध्यापक नाहीत. कुलगुरूंनी विद्यापीठ कायद्यातील तरतुदींचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे 'नुटा'ने नमूद केले आहे.
'नुटा'ने १० कथित अपात्र प्राध्यापकांच्या नावाची यादी कुलगुरूंकडे सादर केली. अपात्र प्राध्यापकांना नामनिर्देशन केल्यास अभ्यास मंडळाचे गठण अवैध ठरेल, असेही निवेदनात म्हटले आहे. संबंधित अधिसूचनेतून अपात्र प्राध्यापकांना वगळावे, आवश्यक पात्रतांची तपासणी न करता त्यांना पात्र ठरविणाºया व्यक्तींवर कारवाई व्हावी, अभ्यास मंडळावर पात्र व्यक्तींचेच नामनिर्देशन व्हावे, अशी मागणी 'नुटा'ने केली आहे. निवेदन देताना अध्यक्ष रघुवंशी, विवेक देशमुख, बी.आर. वाघमारे, सुभाष गावंडे, विजय कापसे, नितीन चांगोले, अशोक भोरजार आदी उपस्थित होते.