अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराविरोधात येथील अन्यायग्रस्त विद्यार्थी कृती समितीने बुधवारी विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर रक्तदान केले. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना रक्तक्षराचे निवेदन सादर करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अन्यायग्रस्त विद्यार्थी कृती समितीच्या बॅनरखाली परीक्षा विभागाचा कारभार सुधारण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. परीक्षा विभागात आॅनलाईन कारभारात गोंधळ उडाल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे निकालात बºयाच त्रृट्या असताना परीक्षा संचालक आणि माइंड लॉजिक कंपनीला कुलगुरू पाठीशी घालत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. परीक्षा विभागाकडून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असून यात विद्यापीठाची प्रतिमा मलीन झाली आहे. तथापि कुलगुरू याबाबत दुर्लक्ष करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. रक्तदानानंतर रक्तक्षराचे निवेदन स्वीकारण्यासाठी स्वत: कुलगुरू सामोरे गेले तेव्हा आंदोलकांनी पुढील ‘टार्गेट’ कुलगुरू राहील, असा निर्वाणीचा इशरा दिला. यावेळी जि.प. सदस्य प्रकाश साबळे, नगरसेवक प्रशांत डवरे, नितीन देशमुख, समिर जवंजाळ, अमोल इंगळे, ऋषिराज मेटकर, आकाश हिवसे, अनूप अग्रवाल, ऋग्वेद सरोदे, संकेत कुलट, प्रफुल्ल ठाकरे, वैभव राऊत, प्रणव लेंडे, शक्ती राठोड, चैतन्य गायकवाड आदी उपस्थित होते. दरम्यान ३१ विद्यार्थ्यांनी रक्तदान करून विद्यापीठ प्रशासनाचा निषेध नोंदविला. आंदोलनादरम्यान काँग्रेसचे नेते बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, संजय देशमुख, सुजता झाडे आदींनी भेटी दिल्यात.
विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा रक्तदानाने निषेध, कुलगुरुंना रक्ताक्षराचे निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 7:42 PM