अमरावती : अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा यांचे नाव दिले गेले आहे. गाडगेबाबा हे स्वच्छतेचे जनक असून, त्यांची दशसूत्री समाजाला मार्गदर्शक ठरली. आता गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा पुढे न्यायचा असेल तर शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी विद्यापीठाने किमान १० गावे दत्तक घेऊन गाव परिवर्तन योजना राबवावी, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी येथे केले. अमरावती विद्यापीठाच्या ३९ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.
केंद्र सरकारचे नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण हे नीतिमूल्य आणि पिढी घडविणारे ठरणार आहे. येत्या काळात आधुनिक शिक्षणप्रणाली विकसित होणार आहे. त्यामुळे आता युवकांनी नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे बनावे. विद्याधन हे कुणीही हिरावू शकत नाही. त्यामुळे शिका, मोठे व्हा आणि समाजाचं ऋण फेडा, असा सल्ला त्यांनी तरुणाईला दिला. यापुढे कोणतेही महाविद्यालय ‘नॅक’ मूल्यांकनाशिवाय राहता कामा नये, यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेऊन सर्वच महाविद्यालयांचे ‘नॅक’ करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून कुलगुरू डॉ. प्रमोद येवले मंचावर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रवींद्र कडू, हर्षवर्धन देशमुख, डॉ. अविनाश बोर्डे, डॉ. आर. डी. सिकची, डॉ. व्ही. एम. मेटकर, डॉ. एच. एम. धुर्वे, डॉ. व्ही. एच. नागरे, सहसंचालक उच्चशिक्षण डॉ. नलिनी टेंभेकर, सहसंचालक तंत्रशिक्षण डॉ. व्ही. आर. मानकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक मोनाली तोटे पाटील, वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. एस. व्ही. डुडुल, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. डी. डब्ल्यू. निचित, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. वैशाली गुडधे यांची उपस्थिती होती.
स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा सुवर्णपदकाचे सात गुणवंत ठरले मानकरी
अभियांत्रिकीच्या विविध सहा शाखांतून प्रथम आणि सर्व शाखांमधून गुणवत्ताप्राप्त एक अशा सात विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. यात आशुतोष राठोड (यवतमाळ), प्रियांका चव्हाण (शेगाव), लखन राठी (अमरावती), प्रतीक जाधव (यवतमाळ), शाहीद शफी तवर (बडनेरा), प्राची अपाले (बडनेरा), समीक्षा ढोक (वरूड) यांचा समावेश आहे.