अमरावती : अधिकृत लेखापरीक्षकांच्या नियुक्तीसाठी पात्रतेसंबंधी विहित आदेशात सुस्पष्ट उल्लेखाअभावी अनेक वाणिज्य पदवीधर विद्यार्थी नियुक्तीपासून वंचित होते. हे लक्षात घेऊन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आवश्यक दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला. त्यामुळे विहित आदेशात सुधारणा करण्यात आली असून, अमरावती विद्यापीठाच्या वाणिज्य पदवीधर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे.
अमरावती विद्यापीठातील वाणिज्य शाखेच्या अभ्याक्रमात अकाउंटन्सी या विषयाऐवजी अकाउंटिग असा उल्लेख आहे. अकाउंटन्सी व अकाउंटिंग हे दोन्ही विषय अकाऊंट या एकाच शीर्षाखाली येतात व दोन्ही विषय एकच आहेत. तथापि, अधिकृत लेखापरीक्षक पात्रतेच्या धर्मादाय आयुक्तांच्या आदेशात विषयाचा उल्लेख अकाउंटन्सी असाच होता. त्यामुळे वाणिज्य पदवीधर विद्यार्थ्यांकडे सनदी लेखापालाचा ५ वर्षाचा अनुभवाचा दाखला असूनदेखील अधिकृत लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात येत नव्हती. ही बाब लक्षात येताच पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा केला. तसेच विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांना यासंबंधी निवेदनही दिले. त्यामुळे विहित आदेशातील त्रुटी दूर करण्यात आली आहे. नवीन अधिकृत लेखापरीक्षक नियुक्तीच्या अटी व शर्तीत सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार लेखाशास्त्र (अकाउंटिंग किंवा ॲडव्हान्स अकाउंटन्सी) व लेखा परीक्षण शास्त्र (ऑडिटिंग) हे विषय घेऊन बी.कॉम. पदवीधर व सनदी लेखापालांकडे पाच वर्षाचा अनुभव असलेले विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. या निर्णयामुळे अनुभव असूनही अधिकृत लेखापरीक्षकाच्या नियुक्तीपासून वंचित राहणाऱ्या अमरावती विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे.