अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने २०२० व २०२१ या दोन वर्षांचे उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार १ मे रोजी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या उपस्थितीत आभासी पद्धतीने प्रदान केले जाणार आहेत. विद्यापीठ स्तर, संलग्न महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था स्तर आणि नावीन्यपूर्ण उपक्रम अशा वर्गवारीत हे पुरस्कार प्रदान केले जातील. रौप्यपदक, गौरव प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे.
सन २०२० च्या विद्यापीठ स्तरावरील उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार शिक्षक संवर्गात पदव्युत्तर मराठी विभागप्रमुख मोना चिमोटे, द्वितीय श्रेणी अधिकारी वर्गवारीत परीक्षेच्या सारणी विभागातील अधीक्षक विवेकानंद इताल, तृतीयश्रेणी कर्मचारी वर्गवारीत आस्थापना विभागातील वरिष्ठ सहायक श्रीकांत तायडे, चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गवारीत वित्त विभागातील शिपाई बाबाराव चौधरी यांना, तर संलग्न महाविद्यालयातील प्राचार्य/संचालक स्तरावरील उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार संवर्गात एल.आर.टी. महाविद्यालय (अकोला) चे प्राचार्य श्रीप्रभू चापके व संलग्नित महाविद्यालयातील सर्व स्तरावरील शिक्षकेतर कर्मचारी वर्गवारीतून ॲड. रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालय (वाशिम) येथील शिपाई राहुल पांडे यांना पुरस्कार घोषित झाला आहे. नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी गाडगे महाराज महाविद्यालय (मूर्तिजापूर, जि. अकोला) या महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे. पाच हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सन २०२१ च्या विद्यापीठ स्तरावरील उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार शिक्षक संवर्गात ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागप्रमुख डॉ. वैशाली गुडधे, प्रथमश्रेणी अधिकारी वर्गवारीत कार्यकारी अभियंता शशिकांत रोडे, द्वितीय श्रेणी अधिकारी वर्गवारीत गोपनीय विभागातील अधीक्षक जयश्री खंडे, तृतीयश्रेणी कर्मचारी वर्गवारीत अभियांत्रिकी विभागातील तांत्रिक सहायक गजानन वनस्कर, चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गवारीत व्यवसाय प्रशासन व प्रबंधन विभागातील शिपाई प्रभाकर सहारे, तर संलग्न महाविद्यालयांतील प्राचार्य/संचालक स्तरावरील उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार संवर्गात एल.आर.टी. विज्ञान महाविद्यालय (अकोला) चे प्राचार्य विजय नानोटी, संलग्न महाविद्यालयातील शिक्षक वर्गवारीत लोकमान्य टिळक महाविद्यालय (वणी, जि. यवतमाळ) च्या सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनंदा आस्वले व संलग्न महाविद्यालयांतील सर्व स्तरांवरील शिक्षकेतर कर्मचारी वर्गवारीतून महात्मा फुले कला व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय (वरूड, जि. अमरावती) येथील ग्रंथालय लिपिक श्री जितेंद्र इंगळे यांना पुरस्कार घोषित झाला. नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी लोकमान्य टिळक महाविद्यालय (वणी, जि. यवतमाळ) ची निवड करण्यात आली असून, पाच हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.