अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या एका ४३ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी नातेवाइकांनी त्याचा मृतदेह शवागारातून घेत घरी नेला. अंत्यक्रियेला सुरुवात झाली. पार्थिवाला आंघोळ घालत असताना हातावर गोंदलेले नाव व वयामुळे महिलांमध्ये कुजबुज सुरू झाली. मृतदेह बदलला तर नाही ना, या शक्यतेने उचल घेतल्याने पार्थिवावरील पांढरे कापड हटविले असता, तो मृतदेह आपल्या आप्ताचा नसल्याचे लक्षात आले आणि एकच खळबळ उडाली. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. शेवटी चुकीने आणलेला मृतदेह शवागारात परत आणून ठेवत संबंधिताचा मृतदेह घरी नेण्यात आला. संपूर्ण खात्री झाल्यानंतर त्या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्थानिक खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुष्पक कॉलनी येथील ४३ वर्षीय व्यक्तीचा जिल्हा सामान्य रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक १५ मध्ये उपचार घेत असताना बुधवारी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला, तर राजापेठ पोलिसांनी गुरुवारी सकाळी गोपालनगर भागात आढळलेल्या अनोळखी वृद्धाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याचा मृत्यू झाल्याने तो मृतदेह देखील शवागारात ठेवण्यात आला.
दरम्यान, गुरुवारी दुपारी पुष्पक कॉलनी येथील त्या तरुणाचे आप्त मृतदेह घेण्यासाठी शवागारात पोहोचले. नाव सांगून त्यांनी पांढऱ्या कापडात गुंडाळलेला मृतदेह तेथून घेतला. मात्र, त्यांनी मृतदेह न पाहता ते घरी घेऊन गेले. पुढे अंत्यसंस्काराच्या प्रक्रियेदरम्यान शरीरयष्टी पाहता, अरे, हा तर आपल्या आप्ताचा मृतदेहच नाही, असे उपस्थित काही महिलांनी सांगितले. या प्रकाराची माहिती खोलापुरी गेट पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे काही वेळाने तो मृतदेह परत शवागारात आणून ठेवण्यात आला व मृतदेहावरील नाव, लेबल वाचून त्या तरुणाचा मृतदेह घरी नेण्यात आला. यात सुमारे पाच ते सहा तास गेले. त्यामुळे त्या तरुणाच्या अंत्यसंस्काराला सायंकाळ उजाडली. दरम्यान, त्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटू न शकल्याने तो मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे.
त्या मृतदेहाचे शवविच्छेदन झालेले नव्हते. त्यामुळे नातेवाइकांनी चेहरा पाहायला हवा होता. आत आहे, घेऊन जा, असे सांगितल्यानंतर नातेवाइकांनी दुसराच मृतदेह घरी नेला. मात्र, वेळीच लक्षात आल्याने पेचप्रसंग टळला.
- पंकज तामटे, ठाणेदार, खोलापुरी गेट