अमरावती : शहरातील ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉ. उन्मेश देशमुख यांची विदर्भ रेडिओलॉजिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी सवार्नुमते नुकतीच निवड झाली. तब्बल तीन दशकांनंतर अमरावतीला हा बहुमान मिळाला आहे.
डॉ. उन्मेश देशमुख हे सहा वर्षांपासून अमरावती रेडिओलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात रेडिओलॉजी ही स्वतंत्र शाखा असून, या क्षेत्रातील अनुभवी आणि निष्णात तज्ज्ञांचे मत अनेक कठीण प्रसंगी विचारात घेतले जाते. डॉ. देशमुख यांनी रेडिओलॉजी या विषयातील संशोधन आणि कार्यातून वेगळा ठसा उमटविला. विदर्भ रेडिओलॉजीस्ट असोसिएशनने त्यांच्या कामाची दखल घेऊन अध्यक्षपदाचा मान दिला आहे.
यामध्ये संपूर्ण विदर्भातील सुमारे २५० रेडिओलॉजिस्ट हे सदस्य आहेत. या संघटनेमार्फत अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. गर्भलिंग निदान प्रतिबंध, बेटी बचाओ - बेटी पढाओ अभियान यांसह अनेक राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील उपक्रमांमध्ये या संघटनेने मोलाचा वाटा उचलला आहे.