अमरावती : भारत हा कृषिप्रधान देश असून, देशातील ७० टक्के जनता आजही ग्रामीण भागात राहते. शहरांचा विकास होत आहे. मात्र, त्या तुलनेत ग्रामीण भाग मागे आहे. परंतु, आता अशा स्थितीत उन्नत भारत अभियानामुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामविकास शक्य असल्याचे प्रतिपादन महापरम संगणकाचे जनक उन्नत भारत अभियानाचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्हर्च्युअल सी-फोर कार्यक्रमात उन्नत भारत अभियानांतर्गत मुलाखतीदरम्यान ते बोलत आहे. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू मुरलीधर चांदेकर, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू आशिष पातुरकर, आय.आय.एल.चे संचालक डी.टी. इंगोले, उन्नत भारत वित्तीय साक्षरतेच्या प्रवर्तक अर्चना बारब्दे उपस्थित होते.माझा जन्म ग्रामीण भागातच झाला असून, शेतकरी प्रश्नांची मला जाण आहे. पाऊस कुठे पडेल, किती पडेल, यासाठी सुपर संगणक उपयुक्त ठरणारा आहे. उद्योगांमध्ये अॅटोमेशन आल्यामुळे रोजगार कमी झाले आहे. परिणामी ग्रामीण भागात रोजगारात वाढ करणे, शेती व्यवसाय जोडधंद्यांना बळकटी देणे काळाची गरज आहे. त्याकरिता विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. पाऊस पडावा म्हणून क्लॉऊड सेटींग टेक्नॉलॉजीचा वापर महत्त्वाचा राहील. ग्रामीण भागातील समस्यांवर संशोधन व्हावे, याकरिता उन्नत भारत अभियानांतर्गत शंभरावर विद्यार्थी पीएच.डी. करीत आहे. स्मार्ट फोन आता ग्रामीण भागात पोहोचला असून ते सर्व सुपर कम्प्युटरशी एकप्रकारे जुळलेत. ती एक क्रांती आहे. विद्यापीठात स्थापित इन्क्युबेशन सेंटरचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपयोग घेता येईल. उन्नत भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात रोजगारसुद्धा उपलब्ध होईल, त्यातून संपूर्ण ग्रामविकासाचे लक्ष साधता येईल, असे डॉ.भटकर यांनी स्पष्ट केले.यावेळी संगणकशास्त्र विभागप्रमुख विलास ठाकरे, व्य.प. सदस्य प्रसाद वाडेगावकर, एल.एल.ई.चे संचालक श्रीकांत पाटील, जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर व विद्यार्थ्यांनी उन्नत भारत अभियानासंदर्भात प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. संचालन व आभार व्हर्च्युअल सी-फोर सेंटरच्या समन्वयक मोना चिमोटे यांनी केले.
उन्नत भारत अभियानात अमरावती विद्यापीठ पहिलेअमरावती विद्यापीठाने सर्वप्रथम उन्नत भारत अभियानाला सुरुवात केल्याचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर मुलाखतप्रसंगी म्हणाले. शिक्षण आणि समाज यांचा जवळचा संबंध आहे. शिक्षणाचा फायदा समाजाला झाला पाहिजे, ते समाजविकासाचे साधन आहे. या अभियानांतर्गत विद्यापीठाची विद्यार्थी शक्ती कार्य करेल. सगळ्या विद्यापीठांना एकत्रित आणून नैसर्गिक साधनसंपत्तीचा विकास या अंतर्गत होईल, असे ते म्हणाले.