लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नर्मदा नदीची परिक्रमा करणाऱ्या ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मातोश्री पुष्पमाला ठाकूर यांचा सत्कार स्वामी रामराजेश्वराचार्य यांच्या हस्ते करण्यात आला. पुष्पमाला ठाकूर यांनी १७ दिवसांत १३१२ किमी अंतर पायदळ पूर्ण करून नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. यानिमित्त सांस्कृतिक भवनात शनिवारी भाव-भक्तीचा अभूतपूर्व संगम अनुभवता आला. यावेळी कन्यापूजन, पाद्यपूजन लक्ष वेधणारे ठरले. या परिक्रमात पुष्पमाला ठाकूर यांच्या दोन भगिनी कुसुम देशमुख आणि सुमन देशमुख यांचाही सहभाग होता. या सन्मान सोहळ्याला अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर उपस्थित होते. नर्मदामाई परिक्रमा सोहळ्याची सुरुवात ही पुष्पमाला ठाकूर यांच्याहस्ते नर्मादामातेच्या प्रतिमेची स्थापना करून करण्यात आली. यानंतर गणेशवंदनेवर शीतल मेटकर यांच्या चमूने नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ना. यशोमती ठाकूर यांनी स्वामी रामराजेश्वराचार्य यांचे पाद्यपूजन केले. तसेच पुष्पमाला ठाकूर यांच्या हस्ते कन्यापूजन करण्यात आले. सन्मान सोहळ्याला बोलताना पुष्पमाला ठाकूर म्हणाल्या की, सुरुवातीपासूनच घरामध्ये आध्यात्मिक वातावरण होते. अध्यात्माबरोबरच सामाजिक सेवा ही भय्यासाहेब ठाकूर यांनी शिकवले. ना. यशोमती ठाकूरने वडिलांची ही परंपरा कायम ठेवल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संचालन मंदा नांदुरकर यांनी केले. कमलताई गवई, माजी मंत्री सुनील देशमुख, आ. बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, माजी आ. जगदीश गुप्ता, नरेशचंद्र ठाकरे, किशोर बोरकर उपस्थित होते.
धर्म माणसे जोडायला शिकवतो : पालकमंत्रीसध्या देशाला विभाजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आपला धर्म हा माणसांना जोडायला शिकवतो. प्रेम करायला शिकवतो, त्यामुळे देश जोडण्याचे काम हे आम्ही करत राहू, असे मत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. यावेळी आपल्या आईच्या नर्मदामाई परिक्रमा सोहळ्याला बोलताना वडिलांच्या आठवणीने त्यांचे डोळे पाणावले होते.
वीणा देऊन सत्कारशंकरबाबा पापळकर यांनी ना. यशोमती ठाकूर यांच्या कार्याचे कौतुक करत महाराष्ट्रासाठी न थांबता देशभरात काम करण्याच्या शुभेच्छा दिल्या. सर्व नेते आपल्या मुलांना समोर आणतात. परंतु पुष्पमाला ठाकूर यांनी आपल्या मुलीला समोर आणले. यशोमतींनी स्वकर्तृत्वाने महाराष्ट्र हादरवून ठेवल्याचे शंकरबाबा पापळकर म्हणाले. पुष्पमाला ठाकूर यांना वारीमधील १५० वर्षं जुनी वीणा भेट देऊन त्यांचा सन्मान केला.