काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद; कलावती बांदुरकर ठरल्या आकर्षण
By गणेश वासनिक | Published: September 12, 2023 04:37 PM2023-09-12T16:37:07+5:302023-09-12T16:39:09+5:30
ॲड. यशोमती ठाकूर, बबलु देशमुख, बळवंत वानखडे, धीरज लिंगाडे यांची दुचाकी रॅली
अमरावती : प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यात काढण्यात आलेली जनसंवाद यात्रा तिवसा विधानसभा मतदारसंघात पोहचल्यानंतर मंगळवार, १२ सप्टेंबर रोजी कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची निर्वाणभूमी असलेल्या वलगाव येथून पुढे मार्गस्थ झाली. यावेळी जनसंवाद यात्रेचे वलगाव येथे जंगी स्वागत करण्यात आले.
ही यात्रा मंगळवारी तिवसा विधानसभा मतदार संघातील कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची निर्वाणभूमी वलगावात पोहचली अन या यात्रेचा पुढचा प्रवास सुरु झाला. वलगावनंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थीस्मारक असलेल्या नया अकोला येथे यात्रा पोहचल्यानंतर अस्थिस्मारकाला अभिवादन करण्यात आले. भ्रष्ट मोदी सरकार व खोके सरकारची पोलखोल या जनसंवाद यात्रेतून करण्यात आली.
वलगाव येथे जनसंवाद यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार ॲड. यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, आमदार धीरज लिंगाडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलु देशमुख, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, निरंजन टकले, कलावती बांदुरकर , आकांक्षा ठाकूर, विलास इंगोले, हरिभाऊ मोहोड, बाळासाहेब हिंगणीकर, प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते.
आमदार यशोमती ठाकूर आणि कलावतीबाई दुचाकीवर
जनसंवाद यात्रा वलगाव येथे पोहोचल्यानंतर येथून दुचाकी रॅली काढण्यात आली. शेकडो दुचाकी वाहनावर सरकार विरोधात घोषणा देणारे कार्यकर्ते आणि काँग्रेस पक्षाचे झेंडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तर एका दुचाकी वाहनावर कलावती बांदुरकर आणि त्या दुचाकीचं सारथ्य आमदार ॲड. यशोमती ठाकूर करीत होत्या. दुचाकी वाहन रॅलीतील हे दृश्य लक्षवेधी ठरले होते.