राज्यमंत्री रणजित पाटील यांची मध्यस्थी : १६ दिवसांपासूनचे आंदोलन मागेअमरावती : गत सोळा दिवसांपासून सुरू असलेले विनाअनुदानित शिक्षकांचे उपोषण गुरुवारी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या मध्यस्थीने सुटले. अघोषित शाळा घोषित करण्याची प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण करू, अशी ग्वाही पाटील यांनी दिल्यानंतर राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीने हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा केली. यावेळी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांचीही उपस्थिती होती. गुरुवारी सकाळच्या सुमारास ना. पाटील यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालय गाठून कृती समितीचे विभागीय अध्यक्ष एस. के. वाहुरवाघ यांच्यासह आंदोलनाला पाठींबा देणाऱ्या नेत्यांशी चर्चा केली. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, शिक्षण संघर्ष समितीच्या संगीता शिंदे, राज्य संघटक पुंडलिक रहाटे यांचेशी चर्चा करत शिक्षकांच्या मागण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे सांगितले. अघोषित शाळांना घोषित करण्यासाठी ना. पाटील यांनी एक महिन्याचा अवधी मागून घेतला. यावेळी खोडके यांनी एक तास थांबवून निर्णय देण्याची सूचना केली. मात्र कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उपोषण सोडण्याबाबत एकवाक्यता दिसून आली नाही. त्यावेळी ना. पाटील यांनी विना अनुदानित शाळा कृती समितीच्या जगदाळे यांच्याशी संपर्क साधून उपोषण सोडवण्यासाठी आपण उपोषणस्थळी आलो आहोत. सरकारनेही अनुदानाबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. अघोषित शाळांचा प्रश्न एक महिन्यात निकाली काढू, असे सांगितले. त्यावर जगदाळे यांनी विभागीय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून उपोषण थांबविण्याची सूचना केली. त्यानंतर निंबू शरबत पाजून उपोषण सोडण्यात आले. दरम्यान यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय खोडके आणि ना. पाटील यांच्यामध्ये शाब्दीक चकमक उडाली. मात्र त्यानंतर वातावरण निवळले. (प्रतिनिधी)आंदोलनाचे विविध टप्पेविनाअनुदानित शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष सुरेश सिरसाट, संघटक बाळकृष्ण गावंडे, गोपाल चव्हाण, मनोज कडू, नितीन टाले, मोहन पांडे, दिलीप उगले यांच्यासह शिक्षकांच्या या आंदोलनाला विविध संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. संजय खोडके व शेखर भोयर हे पहिल्याच दिवसापासून या आंदोलनात सक्रिय होते. तेरवी, रास्ता रोको, मुंडन आदी टप्पानिहाय आंदोलन करून शिक्षकांनी शासनाचे लक्ष वेधले.एकवाक्यतेचा अभावकृती समितीतील काही पदाधिकारी उपोषण सुरूच ठेवण्याच्या मानसिकतेत होते तर काहींचा त्याला जोरकस विरोध होता. सर्वसामान्य शिक्षण उपोषण सुरूच ठेवणार, अशा भूमिकेत होते. त्यामुळे ना. पाटील यांच्या उपस्थितीत कृती समितीमधील पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. एकवाक्यतेचा अभाव प्रकर्षाने आंदोलनाच्या ठिकाणी दिसून आला.
विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन स्थगित
By admin | Published: June 17, 2016 12:16 AM