वाहतुकीची कोंडी, अपघात नित्याचेच, पोलीस व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
चांदूर बाजार : शहरातील जयस्तंभ चौक ते बस स्टँड या मुख्य मार्गावर फळविक्रेत्यांची हातगाड्या रस्त्यावर उभे राहत असल्याने या मार्गावर वाहनांची नेहमीच मोठी रांग लागलेली असते. याकडे पोलीस व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतर्फे केला जात आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून शहरातील व्यवसाय बंद अवस्थेत होते. केवळ भाजीपाला फळ व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होते. अशात रोजगार निर्मिती करण्यासाठी अनेकांनी आपला व्यवसाय बंद करून फळ, भाजीपाला विक्री सुरू केली. यामुळे शहरातील भाजीपाला व फळविक्रेत्यांची दुकानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. बाजारपेठ बंद असल्याने या हातगाड्या मनात येईल तिथे उभे करून व्यवसाय थाटू लागल्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशात संपूर्ण बाजारपेठ पूर्वपदावर आली असताना या फळविक्रेत्यांच्या हातगाड्या अद्यापही कमी झालेल्या नाहीत. पूर्वी या हातगाड्या फुटपाथच्या कडेवर अथवा पालिकेचा फुटपाथवर उभ्या असायच्या. मात्र, आता या हातगाड्या फुटपाथला सोडून जवळजवळ दहा फूट पुढे रस्त्यावर उभे राहून व्यवसाय करीत आहेत. यामुळे दुचाकीचालकांना व पायी ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वाहतुकीच्या कोंडीत भर
मार्गावर बँक, मोठे व्यापारी व लघु व्यापारी ग्राहकांकडून वाहने रस्त्यावर उभे केली जात आहेत. यामुळे वाहतूककोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यातच शहरातील चौकात वाहतूक पोलीस कधीच तैनात नसतात, तर पालिकेचे कर्मचारीसुद्धा याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करतात. पालिकेला रिक्त जागांचे ग्रहण लागले असल्याने या दिवसेंदिवस वाढत असलेल्या अतिक्रमणावर व बेशिस्त भरणाऱ्या बाजारपेठेवर लक्ष ठेवणार कोण, असा प्रश्न सामान्य नागरिकांतर्फे उपस्थित केला जात आहे. या मार्गावरून वाहतूक करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
--------------
अपघात नित्याचेच
आधीच हा रस्ता चौपदरी असतानाही एका वेळी केवळ एकच वाहन या रस्त्यावरून जाऊ शकते. त्यामुळे वाहनांची धडक व अपघात या मार्गावर नित्याचेच झाले असून वाहतुकीच्या कोंडीने स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे झाले आहे.