गजानन मोहोड, अमरावती : २६ व २७ रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने पश्चिम विदर्भात १८ तालुक्यांतील ८२३ गावांत ४५ हजार हेक्टरमधील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीत लहान-मोठ्या सात गुरांचा मृत्यू झाल्याचा विभागीय आयुक्तांचा प्राथमिक अहवाल आहे.विभागात पाचही जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये गारपिटीने सर्वाधिक नुकसान बुलडाणा व अकोला जिल्ह्यात झालेले आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेद्वारे होत आहे. अहवालानुसार बुलडाणा जिल्ह्यात २५९ गावांत २१,७६८ हेक्टरमधील गहू, हरभरा, तूर, मका, ज्वारी, कांदा व भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.
याशिवाय अकोला जिल्ह्यात ३६१ गावांत १७,०६९ हेक्टरमधील रब्बी व भाजीपाला पिकांचे नुकसान झालेले आहे. अमरावती जिल्ह्यात १४५ गावांत २,२७८ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यात ३२ गावांत ४५० हेक्टर व वाशिम जिल्ह्यात २६ गावांमधील ३,०१४ हेक्टरमध्ये नुकसान झालेले आहे. अमरावती जिल्ह्यात एक बैल, अकोला जिल्ह्यात एक घोडा, बुलडाणा जिल्ह्यात दोन वासरे व वाशिम जिल्ह्यात एक बकरी, एक गोऱ्हे व एका गायीचा आपत्तीत मृत्यू झालेला आहे.