अमरावती: जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या वादळासह अवकाळी पाऊस, गारपिटीने ५२३ गावांमध्ये रबी गव्हासह फळपीक व भाजीपाला पिकाचे ३५३८९ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल आहे. यामध्ये सर्वाधिक २३६९२ हेक्टरमध्ये नुकसान चांदूरबाजार तालुक्यात झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बाधित पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
या आपत्तीमध्ये उशिरा पेरणी झालेला व आता काढणीला आलेला १९७९ हेक्टरमधील गहू, ३८ हेक्टरमधील हरभरा, ६२६ हेक्टरमधील ज्वारी, २२९ हेक्टरमधील तीळ, १ हेक्टरमध्ये पपई, १८,२७० हेक्टरमधील संत्रा, ४४५ हेक्टरमधील केळी, ६ हेक्टरमध्ये आंबा व ९६ हेक्टरमधील इतर पिकांचे नुकसान झालेले आहे. या आपत्तीमध्ये भातकुली तालुक्यात ५२.३३ हेक्टर, चांदूर रेल्वे २७, धामणगाव १८८, अचलपूर ३९१८, अंजनगाव सुर्जी ३३८, दर्यापूर ३७८, मोर्शी ६७८७, चांदूरबाजार २३६९२ व अमरावती तालुक्यात १० हेक्टरमध्ये मोठे नुकसान झाल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा प्राथमिक अहवाल आहे.