गजानन मोहोड/अमरावती : ४८ तासांपासून पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरु असल्याने व मध्य प्रदेशातूनही येवा वाढल्याने उर्ध्व वर्धा प्रकल्प १०० टक्के भरला व ११ गेट शुक्रवारपासून उघडण्यात आलेले आहे. याशिवाय शहानूर वगळता चंद्रभागा, पूर्णा व सपन प्रकल्पही ओव्हरफ्लो झाले आहेत. याशिवाय २० लघूप्रकल्पाही पुरेसा साठा झाल्याने दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात ४८ तासांपासून दमदार पावसाची नोंद झालेली आहे. याशिवाय पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने या प्रकल्पात येवा वाढला आहे. मोर्शी व वरुड तालुक्यात संततधार पाऊस सुरु असल्याने उर्ध्व वर्धा प्रकल्पात १०० टक्के म्हणजेच ५६४ दलघमी साठा आहे. त्यामुळे प्रकल्पाचे १३ ही गेट ८० से.मी.ने उघडण्यात आलेले आहे व १६८९ क्युमेक पाण्याचा विसर्ग सोडला आहे. त्यामुळे वर्धा नदीसह इतरही नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
सपण प्रकल्पाचे दोन दरवाजे ५० सेंमीने उघडण्यात आलेले असून १६.८४ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत आहे. चंद्रभागा प्रकल्पाचे सर्व दरवाजे सुरक्षित पाणी पातळी आल्यावर बंद करण्यात आलेले आहे.