नागरिकांच्या जीवितास धोका : बडनेरा पोलिसांची कारवाई अमरावती : सार्वजनिक ठिकाणच्या हॉटेल टपऱ्यांवर घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्या तिघांवर बडनेरा पोलिसांनी गुरुवारी कारवाईचा बडगा उगारला. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने गॅस शेगडी व सिलिंडरचा वापर करताना आरोपी आढळून आले आहे. पोलिसांनी तीन सिलिंडर जप्त केले असून टपरीचालकांवर गुन्हा नोंदविला आहे. बडनेरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्राजक्ता धावडे हे पोलीस पथकासह रेल्वे स्थानक परिसरात गस्तीवर होते. दरम्यान आरोपी मनोज रमेश रामटेके (रा. न्यू प्रभात कॉलनी) हा सार्वजनिक ठिकाणी घरगुती सिलिंडरचा वापर करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी मनोज रामटेके यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील सिलिंडर जप्त केले आहे. त्याचप्रमाणे अकोला नाक्यावर आरोपी शेख लाल शेख रिजवान (२७,रा. पठाण चौक) हा सुद्धा सार्वजनिक ठिकाणी गॅस सिलिंडरचा वापर करताना आढळून आला. तसेच शेख अनिस शेख युनुस (३२,रा. लोणी टाकळी) हासुध्दा घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करताना पोलिासंना आढळून आला. या तीनही प्रकरणांत पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम २८५ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास बडनेरा पोलीस करीत आहे. (प्रतिनिधी)
हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा वापर
By admin | Published: February 05, 2017 12:06 AM