गणेश वासनिक अमरावती : वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर म्हणजे राखीव, संरक्षित वा झुडुपी जंगलावर अतिक्रमण असल्यास ते हटविण्यासाठी आता गुगल अर्थ या सॉफ्टवेअरचा वापर करावा लागणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९७३ अंतर्गत कारवाईचे धोरण असून, नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार वनजमिनींवरील अतिक्रमण हटविता येईल. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९७३, भारतीय वन कायदा १९३७ आणि भारतीय वन्यजीव कायदा १९७२ अन्वये राज्य शासनाने वनजमिनींवर अतिक्रमण हटविण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत.
मुख्य वनसंरक्षक ते वनक्षेत्राधिकारी यांना वनजमिनींवरील अतिक्रमण हटविण्याबाबत नव्या मार्गदर्शक तत्त्वांनी बळकटी दिली आहे. वनजमिनींवर अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आल्यास गुगल प्रतिमा काढून ते हटविण्याची कारवाई करता येते. भारतीय वनकायदा १९२७ मधील कलम २६ (४) नवीन तरतुदीनुसार अतिक्रमिकाने विरोध केल्यास, त्यास अटक करून कारवाई करण्याचे अधिकार बहाल केले आहे. याप्रकरणी गुन्हेगारास सहा महिन्यांची शिक्षा असून, हा गुन्हा अजामीनपात्र आहे. अतिक्रमणासोबत झाडे तोडणे, जमीन समांतर करणे, सीमा पिलर हलविणे या गुन्ह्यांकरिता विविध कलमान्वये कारवाईचे अधिकार वनाधिकाºयांना देण्यात आले आहेत.
असे शोधता येईल गुगल अर्थने अतिक्रमणवनजमिनींवर अतिक्रमण उच्चाटनात गुगल अर्थचा वापर करतेवेळी जीपीएसद्वारे घेतलेले पॉलीगॉन गुगल अर्थ किंवा गुगल प्रो वर ड्रॅग व ड्रॉप करून टाकावे लागेल. त्यानंतर डाव्या वरच्या कोपऱ्यात टूल मेन्यूमधील घड्याळाचे चित्र क्लिक करावे लागेल. डाव्या वरच्या कोपºयात एक टाइम लाइन उघडेल. सदर टाइम लाइनवरील कर्सर २००६ वरून घेऊन गेला असता, २००६ ला त्या जमिनीवर काय होते, याचे चित्र उघडेल. ते चित्र तत्काळ फाइल मेन्यूूमध्ये जाऊन सेव्ह ईमेज केल्यानंतर एक बॉक्स उघडेल. या बॉक्समध्ये नकाशास नाव देता येईल. बॉक्समधील सेव्ह इमेजचे बटन दाबल्यानंतर इच्छित स्थळी नकाशा सेव्ह होईल. अशा पद्धतीने २००९, २०१३ व २०१६ करिता नकाशा चित्रे काढता येतील. या नकाशात स्केल नाही. परंतु, इमेज जमिनीपासून किती फूट अंतरावर घेण्यात आले, हे नकाशात नमूद असते. अशा पद्धतीने तीन-चार नकाशा चित्रांची तुलना करून अतिक्रमणाबाबत चांगला पुरावा मिळण्यास मदत होते. अतिक्रमणापूर्वी आणि नंतरची गुगल प्रतिमाने जमिनींवरील अतिक्रमण शोधता येईल. हे नकाशे भारतीय पुरावा कायदा १८७२ चे प्रमाणपत्र जोडून न्यायालयात दाखल करता येते.
६९ हजार हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमणराज्यात सुमारे ६९ हजार हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण असल्याची नोंद विभागाकडे आहे. यात सर्वाधिक ठाणे, नाशिक व धुळे जिल्ह्यात अतिक्रमण असल्याचे वनविभागाने माहिती अधिकारात दिलेल्या आकडेवारीहून स्पष्ट झाले. तथापि, पाच लाख हेक्टरहून अधिक वनजमिनीवर अतिक्रमण असल्याचा अंदाज आहे.
वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. गुगल अर्थचा वापर करून अतिक्रमण शोधले जाईल. दोषींविरुद्ध प्राथमिक गुन्हा जारी करणे तसेच न्यायालयात पुराव्यानिशी प्रकरण सादर करून दोषींना कठोर शिक्षा होईल अशी कार्यवाही केली जाणार आहे.- विकास खारगे, प्रधान सचिव, वनविभाग.