फोटो -
धामणगाव रेल्वे : जन्मदात्याची साथ, महाविद्यालयातील सर्वोत्तम शिक्षण, आपले अथक परिश्रम यामुळे आज पदवी मिळाली असली तरी ज्ञानगंगेचा वापर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करा, जीवनात आपले आदर्श ठरवा, असे मत माजी आमदार कथा श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुणभाऊ अडसड यांनी व्यक्त केले.
श्रीराम शिक्षण संस्था अंतर्गत येणाऱ्या श्रीराम महिला कला महाविद्यालय व स्व. दादाराव अडसड शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील एमए मराठी, बीए, बीपीएड, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील अशा सण २०२०-२१ या सत्रातील ५२ विद्यार्थ्यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ तथा पदवी वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार अरुण अडसड होते. प्रमुख अतिथी म्हणून श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव घनश्याम मेश्राम, संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या पीएचडी व नामांकन विभागाच्या सहायक कुलसचिव मीनल मालधुरे, संचालक सुभाष देशमुख, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकिशोर राऊत, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य हर्षल मालधुरे, स्व. नंदलाल लोया व श्रीराम कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य अर्चना राऊत यांची उपस्थिती होती. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षण मिळावे म्हणून सन १९९९ मध्ये पंधरा विद्यार्थिनींना प्रवेश देऊन हे महाविद्यालय सुरू केले होते. जिल्ह्यात आज सर्वाधिक विद्यार्थिनी या श्रीराम महिला महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत, असेही अरुण अडसड म्हणाले. सहायक कुलसचिव मीनल मालधुरे, संस्थेचे सचिव घनश्याम मेश्राम, संचालक सुभाष देशमुख, प्राचार्या अर्चना राऊत यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक श्रीराम महिला महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकिशोर राऊत, संचालन राजेश आडे व आभार प्रदर्शन योगेश काशीकर यांनी केले.