चांदूर बाजार : मानवी शरीरासाठी टरबूज, खरबूज हे अतिशय पोषक असतात. हे टरबूज, खरबूज लहानपणापासून तर वृद्धांपर्यंत मोठ्या आवडीने खात असतात. त्यामुळे शहरात व ग्रामीण भागातही ठिकठिकाणी चौकाचौकांत शीतवर्धक फळांची दुकाने पाहायला मिळते. पण, ही फळे आरोग्यास हितकारक असली तरी त्या फळांचा आकार वाढविण्यासाठी तसेच रंग गडद दिसण्याकरिता अनेकांतर्फे ऑक्टोसिन नावाचा घातक रसायनांचे इंजेक्शन फळांना दिले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळेच मानवी जीवनावर त्याचा परिणाम होऊन निरनिराळ्या रोगास नाईलाजास्तव बळी पडण्याची वेळ आली असल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे.
आरोग्यवर्धक म्हणून प्रत्येक फळांना महत्त्व आहे. यात टरबूज, खरबूज, काकडी, सफरचंद, पपई, अननस, आंबा, डाळिंब, केळी यासारख्या आरोग्यवर्धक फळांना जास्तीत जास्त मोठा आकार तसेच रंग देण्यासाठी निरनिराळ्या रसायनांचा वापर केला जातो. यात काही खासगी कंपन्या शेतकऱ्यांना बीज पुरवून त्या फळांच्या देठामध्ये घातक रसायन असलेले रासायनिक औषध तीन ते चार मिलि सोडण्यासाठी सांगतात. यामध्ये प्रामुख्याने ऑक्टोसिन नावाचे घटक असलेल्या इंजेक्शनचा वापर करण्यात येतो. याकडे अन्न व औषध प्रशासनचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे.
शासनाने अशा प्रकारच्या रसायनांवर आधीच बंदी घातलेली असल्याने तसे इंजेक्शन आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात येत आहे. परिसरात त्याची विक्री सर्रास होताना दिसत आहे. इंजेक्शनचा उपयोग प्रामुख्याने वासरू मरण पावलेल्या दुधाळ जनावरांचे दूध काढतेवेळी करण्यात येतो. याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन शासनाने यावर त्वरित बंदी आणलेली होती. असे असतानादेखील याचा फायदा सध्या वेगवेगळ्या नावाने किंवा ब्रॅण्ड बदलून खाजगी कंपन्या तरबूज, खरबूज उत्पादकांना पुरवताना दिसत आहे. या रासायनिक औषधींचा वापर मोठ्या प्रमाणात होत असला तरी अनेक शेतकरी मात्र आजही मोठी मेहनत घेऊन विना रासायनिक औषधींचा वापर करून टरबूज व खरबूज पीक पिकवित आहे. मात्र हंगामपूर्वी पीक बाजारपेठ मध्ये विक्रीस आणून जास्त नफा कामविण्याचा नादात अनेक उत्पादक याचा वापर करत असल्याची चर्चा आहे. तसेच अनेक टरबुजामध्ये लाल रंग नसल्यास टरबूज विक्रेते त्या टरबूजमध्ये इंजेक्शन च्या साह्याने गडद रंग आणण्याची प्रक्रिया करण्यात येत असल्याचे बोलले जाते. यामुळे या सर्व प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासनने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.