अमरावती : महाबीज कंपनीने सोयाबीन बियाण्यांचे दर रुपये ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपये जाहीर केले आहेत. खासगी कंपन्यांचे सोयाबीनचे दर जवळपास १० हजारांपर्यंत जाऊ शकतात, असा अंदाज आहे. जिल्ह्यात अनेक शेतकरी बांधवांनी उगवणक्षमता तपासणी करून चांगले सोयाबीन बियाणे राखून ठेवलेले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शक्यतोवर घरचेच सोयाबीन बियाणे वापरावे व उगवणशक्ती तपासूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
सोयाबीनला पर्यायी पीक म्हणून ज्वारी, मूग, उडीद, तीळ या पिकांचा आंतरपिक म्हणून उपयोग करावा. सोयाबीनची पट्टापेरा पध्दतीने पेरणी करावी. सोयाबीन अधिक तूर या आंतरपिकात ६ : १ चा पेरा करण्याऐवजी सात दात्याचे पेरणीयंत्र वापरावे. त्यात मधल्या दात्यामध्ये तूर व त्याच्या दोन्ही बाजूला १-१ दाता रिकामा ठेवून दोन्ही बाजूचे २-२ दाते सोयाबीन, ज्वारी, तीळ, मूग, उडीद असे आंतरपिकाचे बियाणे पेरावे. त्यात रिकाम्या सोडलेल्या ओळीमध्ये डवऱ्याला दोरी गुंडाळून सरी काढल्यास आंतरपिकाला गादी वाफ्यासारखा वातावरणाचा फायदा मिळेल. त्यामुळे त्यांच्या उत्पादनात सुध्दा चांगली भर पडू शकेल व आंतरपीक पेरणीमुळे बियाण्यांमध्ये २० टक्के बचत सुध्दा होऊ शकते.
शक्यतोवर सोयाबीन पेरणीसाठी घरचेच राखून ठेवलेले सोयाबीन वापरावे व उगवणशक्ती तपासणी करूनच पेरणी करावी. सोयाबीन स्वतःकडे उपलब्ध नसल्यास गावातील इतर शेतकऱ्याकडून बियाणे आताच खरेदी करावे. गावात सोयाबीन बियाणे मिळत नसल्यास लगतचा तालुका, जिल्ह्यातून बियाणे उपलब्ध करून घ्यावे. तसेच पुढील हंगामासाठी आतापासूनच स्वतःकडील सोयाबीन बियाणे राखून ठेवावे, सोयाबीनला पर्यायी पिके ज्वारी, मूग, उडीद, तीळ यांचा वरीलप्रमाणे आंतरपीक पध्दतीने पेरणीसाठी विचार करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चवाळे यांनी केले आहे.
कोट
कृषि विभागाच्या क्षेत्रिय कर्मचाऱ्यांनी सोयाबीन बियाणे उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांच्या नावांची यादीसुध्दा केलेली आहे. अमरावती जिल्ह्यालगत अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रतीचे सोयाबीन उपलब्ध आहे व ते रास्त भावात शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकते. तशी माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालय, त्या-त्या जिल्ह्याचे कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाकडे मिळतील. शेतकरी बांधवांनी सोयाबीन बाजारातून विकत घेण्यापेक्षा शेतकरी बांधवांनी स्वतःकडे, किंवा आपल्या नातेवाईकांकडे जपून ठेवलेले सोयाबीन खरेदी करून पेरणीसाठी वापरावे.
- विजय चवाळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी