अमरावती : दिव्यांग बांधवांचे सुविधांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असलेल्या राखीव निधीचा पुरेपूर विनियोग होणे आवश्यक आहे. दिव्यांगांना अधिकाधिक सुविधा मिळवून देण्यासाठी व प्रक्रियेत पारदर्शकता तसेच उपस्थित राहण्यासाठी दिव्यांग पवित्र पोर्टलचा उपयोग होईल असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.
जिल्हा परिषदेतर्फे दिव्यांग पवित्र पोर्टलचे लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, आ. बळवंत वानखडे, किशोर बोरकर, जिल्हा अधिकारी शैलेश नवाल, सीईओ अमोल येडगे महापालिका आयुक्त प्रशांत रोडे उपस्थित होते. दिव्यांग बांधवांना विविध सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी दिव्यांग मित्र या पोर्टलचा फायदा होणार आहे. त्या अनुषंगाने सर्व नोंदी प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण करावी तसेच त्यांना आवश्यक सुविधा आदी तपशील सुस्पष्टपणे ऑनलाईन असावा पुनर्वसन केंद्राच्या इमारतीचे कामही पूर्ण करण्यात येईल तिथे ग्रंथालय अभ्यासिका आदी सुविधा पुरविल्या जातील. त्यासाठी आवश्यक निधी मिळवून देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांकडे राखीव निधीतून दिव्यांगांना अधिकाधिक सुविधा मिळवून द्याव्यात कुठलाही निधी अखर्चित राहता कामा नये असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. महापालिका जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद यांच्या निधीतून दर पाच वर्षांनी दिव्यांगांच्या मेळाव्याची ही तरतूद करावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
बॉक्स
१६ हजार व्यक्तींची नोंदणी
दिव्यांग मित्र पोर्टलवर ४० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींची नोंद करण्यात येते. त्यानुसार १६ हजार व्यक्तींची नोंदणी केल्याचे सीईओ अमोल येडगे यांनी सांगितले. दिव्यांगांना लागणाऱ्या उपकरणांची पूर्तता तसेच इतरही योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी या डाटाबेसचा वापर करता येणार आहे.