अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यंदा विविध तर्कविर्तकांनी ही निवडणूक गाजत आहे. सहकारातील राजकीय डावपेचांनी आधीच रंग भरलेल्या या निवडणुकीत आता सप्तरंगी मतपत्रिकासुद्धा वापरण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक खऱ्या अर्थाने कलरफुल होत आहे.
आगामी ४ ऑक्टोबर रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बहुप्रतीक्षित निवडणूक होत असून, या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून एकमेकांना शह देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात ३ पॅनल आमने-सामने उभे ठाकले आहे. मतदारसंघनिहाय मतपत्रिकांचा वापर या निवडणुकीत होणार आहे. त्यानुसार सेवा सहकारी सोसायटी साठी पांढरा, अनु जाती जमाती प्रवर्गासाठी फिक्कट निळा, विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी पिवळा, महिला राखीव मतदारसंघातील गुलाबी, इतर मागास वर्गासाठी फिक्कट हिरवा, क १ मतदारसंघासाठी केसरी, तर क २ या मतदारसंघातील पोपटी रंगाच्या मतपत्रिकांचा वापर करण्यात येणार आहे.