राजेंद्र पांडे : कायद्याबाबत मार्गदर्शन शिबिरचांदूरबाजार : देशातील सर्वसामान्य नागरिकांना ग्रामपंचायतीपासून तर संसदेपर्यंतच्या सर्वच कामकाजाची, माहिती प्राप्त करुन घेण्याचा अधिकार मिळावा यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा संसदेने संमत केला. परंतु अजूनही या कायद्याचा वापर प्रामाणिकपणे होताना दिसत नाही. आर.टी.आय. कायद्याचा सकारात्मक वापर केला तर, विकासाला चालना मिळून भ्रष्टाचार थांबेल. एवढी शक्ती या कायद्यात आहे, असे प्रतिपादन राजेंद्र पांडे यांनी स्थानिक पंचायत समिती सभागृहात आयोजित मार्गदर्शन शिबिरात केले. यावेळी ठाणेदार सतीशसिंह राजपूत, ब्राह्मणवाडा थडीचे ठाणेदार अजय आखरे व जाधव हे उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्शी पुणे यांच्यासाठी, सामाजिक न्याय विभाग अमरावती यांचेकडून घेण्यात आले होते. पांडे पुढे म्हणाले, १५ जून २००५ ला संसदेने हा कायदा संमत केला. १२ आॅक्टोबर २००५ ला लागू केला. याला नागरिकांसोबत शासकीय अधिकारी कर्मचारी ही जबाबदार आहेत. या कायद्याचे खरे महत्त्व समजून न घेता सर्वांनी त्याची अंमलबाजवणीत अडथळा निर्माण करून सर्वसामान्यांच्या अज्ञानाचा गैरफायदाच घेतला व भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाचा प्रश्न कायमा ठेवला. खरे तर कायद्यान्वये समाजातील अपेक्षित घटकांना अधिकारी स्वरुप खूप मोठे शस्त्र प्राप्त झाले आहे. या शस्त्राचा उपयोग अन्यायाविरुध्द वापर होऊन भ्रष्टाचाराला कायम स्वरुपी मूठमाती मिळावी, असा शासनाचा मानस होता. या कायद्याचा वापर करुन भ्रष्टाचाराला थांबवून विकासाला चालना मिळण्यासाठी हा कायदा प्रत्येकांना समजून घ्यावा लागेल. या कायद्यात एकूण ३१ कलमे असून त्या कलमांमुळे आपण समाजहित व विकास कसा साधू शकतो हे नागरिकांनी अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी शिकून घ्यावा लागेल. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर कायद्यासंदर्भात मार्गदर्शन शिबिर घेणे आवश्यक आहे. शिबिराचा लाभ पंचायत समिती कर्मचारी व विद्यार्थ्यांनी घेतला. संचालन अर्चना सुंट, तर आभार स्मीता मोरे यांनी मानले. शिबिरासाठी गौरव अवचट, पूजा खांडेकर, पूजा गौतम यांनी प्रयत्न केले. (तालुका प्रतिनिधी)
‘आरटीआय’च्या वापराने भ्रष्टाचार थांबेल
By admin | Published: January 25, 2016 12:20 AM