फोटो - जावरे १२ एस आदिवासींचा सहकार : वणव्यामुळे हजारो हेक्टर जंगलाची राखरांगोळी थांबविण्याचा प्रयत्न
परतवाडा : मेळघाटातील आदिवासी मोहफुले वेचण्यासाठी झाडाखालील कचरा जाळतात. ती आग पत्र जंगलात वणवा म्हणून पेट घेते. मात्र, आता आग न लावता खराट्याने झाडून किंवा ताडपत्री आणि साड्यांचा वापर करून मोहफुले वेचली जात आहेत. जंगलाच्या संरक्षणासाठी तसेच निसर्ग वाचवण्यासाठी परिवर्तनाची ही नांदी ठरली आहे.
धारणी, चिखलदरा तालुक्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि वनविभागाच्या जंगलांमध्ये वणवा पेटत आहे. शासनातर्फे आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी कार्यरत क्षेत्रीय कर्मचारी मजुरांना सोबत घेऊन आग विझवण्याचे कार्य करीत असताना, या आगी लावणाऱ्यांमध्येच जनजागृतीचे कार्य अंगारमुक्त जंगल स्पर्धेच्या माध्यमातून केले जात आहे. या कार्याची दखल आता आदिवासी घेऊ लागल्याचे चित्र पुढे आले आहे.
बॉक्स
आदिवासींसाठी अष्टसूत्री
वनकर्मचारी आणि आदिवासी अशी सतत उडणारी संघर्षाची ठिणगी जंगलाची राखरांगोळी करून थांबते. मेळघाटात अतिक्रमणाकरिता दरवर्षी हळूहळू शेतीचे धुरे जाळणे आणि क्षेत्र वाढवणे असे प्रकार घडतात. मोहफुले वेचण्यासाठी तसेच गुरांसाठी चारा फुटावा, तेंदुपत्त्याची कोवळी पाने यावी, यासाठी या आगी लावल्या जात असल्याचा सततचा आरोप आहे. अंगारमुक्त जंगल स्पर्धेत काही बाबींकरिता आदिवासींना आवाहन केले आहे. तेंदुपत्ता तोडण्याकरिता, मोहफुले वेचताना आग लावू नये. साडी, ताडपत्री, जाळी, खराट्याचा वापर करावा. शेताचे धुरे जाळू नये. शेतातील काडीकचरा जाळू नये. शेतात कंपोस्ट खड्डे तयार करून खत करावे. या कामांकरिता गावांना प्रत्येकी १० गुण देण्यात येणार आहेत. धारणीच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांनीसुद्धा आदिवासी पाड्यांमध्ये समन्वय साधून आगीच्या घटना कशा थांबवता येईल, यावर गावकऱ्यांशी संवाद साधला. वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश महल्ले स्पर्धेचे समन्वयक धनंजय सायरे सहकारी कार्य करीत आहेत.
बॉक्स
सहभाग मिळाला, झाली सुरुवात
धारणी तालुक्यातील सोसोखेडा येथील आदिवासी शेतकऱ्यांनी शेतात कंपोस्ट खड्डे केले. काडीकचरा न जाळण्याचा संकल्प केला. प्लास्टिकयुक्त खताने शेती खराब होण्याचे अनुभव आले. गावातील उकीरडे प्लास्टिकमय झाले आहेत. त्यापेक्षा शेतात असे कंपोस्ट केले, काडीकचरा जाळला नाही, तर शेतात चांगले खत मिळेल. सोसोखेडा गावातील भूनाडेप कंपोस्ट खड्डा करणारे शेतकरी दाम्पत्य संगीता-दयाराम मावस्कर, राधा-अनिल बेठेकर, गीता-श्रावण तंडीलकर, रामकली-संतुराम बेठेकर, कविता-नारायण दहिकर, जिजाबाई-सबूलाल मावस्कर, सुखाई-फुलचंद मावस्कर, सबुराई-हरी कासदेकर, ऊर्मिला-हिरना खडके, जानकी-रामलाल कासदेकर, जसवंती-कुंजीलाल सावलकर, मुन्नी-रामजी सावलकर, भुलकी-मौजीलाल ठाकरे, भागरती-मुंगीलाल सावलकर, हिरुबाई-जानू सावलकर
स्पर्धेत सहभागी झाले आहेत. बॉक्स
चिखलदरा, धारणीतील अनेक गावे सहभागी
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील अनेक गावे आता स्पर्धेत सहभागी होऊ लागली आहेत. पालसकुंडी, खोंगडा, कंजोली, टेटू, आमझरी, मोथाखेडा, जामून नाला, आढाव, बोथरा, वासाली, राहनापूर, चिपी, आवागड, मेहरीअम, चोपण, खोकमार, रेहट्याखेडा कोहना, बिहाली, चोबिता, चेथर, सोसोखेडा, बोदू, धारणमहू, पोटीलावा, भोंडीलावा, आडनदी, पाडीदम, कासाईखेडा अशा अनेक गावांतील ग्रामस्थ मोहाफुले वेचण्याचा नवीन प्रयोग करून जंगलात आग न लागण्याची खबरदारी घेत आहेत.