अमरावती: संदीप मानकर
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील पूर्णा नदीवर असलेल्या घुंगशी प्रकल्पात यंदा पाणीसाठा नसल्याने मूर्तिजापूर शहराला तातडीने पाणी देण्याचा प्रयोग फसला आहे. मागील वर्षी धरणातून विशेष बाब म्हणून मूर्तिजापूर शहराला धरणातून पाइप लाइनच्या साहाय्याने पाणी देण्यात आले होते. यंदा मात्र प्रकल्पच कोरडा असल्याने चिंता वाढली आहे.
घुंगशी मध्यम प्रकल्पाची कामे पूर्ण झाली असून, या प्रकल्पातून ६३४३ हेक्टर सिंचन निर्मिती होणार आहे. परंतु, मागील वर्षी फक्त १५० हेक्टर जमीन भिजली होती. प्रकल्पाची क्षमता १७.४५ दलघमी आहे. मागील वर्षी मूर्तिजापूर शहरातील पाणीटंचाईवर उपाय म्हणून या प्रकल्पातून पाइप लाइन टाकून शहराला पाणी देण्यात आले होते.
यंदाही टंचाई कायम आहे. मात्र, अपेक्षित पाऊस न झाल्याने धरण कोरडे पडले आहे. पूर्णा नदीलाही पूर गेला नाही. त्यामुळे प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करता आले नाही. सदर प्रकल्प हा अमरावती जलसंपदा विभाग (विशेष प्रकल्प) द्वारा पूर्ण करण्यात आला. लवकरच पाइप वितरण प्रणालीची कामे करण्यात येतील. त्याकरिता निविदासुद्धा काढण्यात येणार आहे.
प्रकल्पावर ३२९ कोटींचा खर्च
घुंगशी मध्यम प्रकल्पाची अद्ययावत किंमत ५००.१६ कोटी असून, आतापर्यंत ३२९ कोटींचा खर्च झाला आहे. प्रकल्पातून कालव्याऐवजी पाइप वितरण प्रणालीद्वारे शेतकºयांच्या शेतापर्यंत सिंचनाकरिता पाणी देण्यात येणार आहे. त्याकरिता यंदा १०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पण, शासनाने कंत्राटाचा बी-१ चा सुधारित प्रस्ताव मागितल्यामुळे पाइप लाइनची कामे आता लांबणीवर पडणार आहेत.