अमरावती : राज्याच्या कारागृहांमध्ये वरिष्ठ अधिकारी ते शिपाई पदापर्यंत अनेक पदे रिक्त आहेत. मात्र, कारागृह प्रशासनाकडे कोणी फारशे लक्ष देत नाही. त्यामुळे कारागृहांची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आल्याचे चित्र आहे. परंतु, गृह विभागाचे (अपील, सुरक्षा) नवे प्रधान सचिव शाम तागडे यांनी पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. तागडे हे विदर्भाचे सुपूत्र असून, त्यांना कारागृहाच्या रिक्त पदांसह पदोन्नतीचा विषय नियोजनबद्ध पद्धतीने हाताळावा लागणार आहे.
राज्याच्या मध्यवर्ती कारागृहाच्या ९ पैकी ७ कारागृहांमध्ये अधीक्षकपदी कायमस्वरूपी अधिकारी नाही. सात जागांवर प्रभारी कामकाज सुरू आहे. परिणामी मध्यवर्ती कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहे. कारागृह पूर्व विभाग, नागपूरच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची पुणे विभागात बदली झाली आहे. परंतु, साठे यांच्याकडे पुणे, नागपूर अशा दोन्ही कारागृह विभागाचा हेविवेट कारभार आहे.
डीआयजी मुख्यालय पुणे, कारागृह मध्य विभाग औरंगाबाद आणि पूर्व विभाग नागपूर येथे डीआयजी पदी पात्र अधिकाऱ्यांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर जेलरची १०० पदे रिक्त असून, त्यापैकी ४० पदांचा अनुशेष एकट्या विदर्भात आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलडाणा, यवतमाळ जिल्हा कारागृहाच्याअधीक्षकांच्या बदल्यांचा कालावधी होऊनही फाईल प्रलंबित आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भाचे सुपूत्र असून, त्यांच्या सोबतीला गृह विभागाचे प्रधान सचिव शाम तागडे हेदेखील विदर्भाचेच आहेत. त्यामुळे राज्याच्या कारागृहात रिक्त पदांचे ग्रहण, पदाेन्नतीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी शक्यता आहे. मुंबईत २२ वर्षानंतर ‘जेल कॅडर’ची वर्णी
कारागृह विभाग मुंबईच्या कारागृह उपमहानिरीक्षकपदी तब्बल २२ वर्षानंतर योगेश देसाई यांची वर्णी लागली आहे. अगोदर मुंबई विभागात आयपीएस अधिकाऱ्यांची डीआयजीपदी वर्णी व्हायची. मात्र, आता योगेश देसाई यांच्या रूपाने २२ वर्षानंतर ‘जेल कॅडर’ ची वर्णी लागली आहे. देसाई यांच्याकडे औरंगाबाद डीआयजीच्या सुद्धा प्रभार आहे. मुंबई कारागृह विभागाच्या अधिनस्थ मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, सिंधुदूर्ग आदी भाग येतो. तागडे यांच्यापुढे तीन महिने चॅलेजिंग
गृह विभागाचे (अपील, सुरक्षा) नवे प्रधान सचिव शाम तागडे हे डिसेंबर २०२२ मध्ये सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे कारागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, पदोन्नती, अधीक्षकांची वर्णी, जेलरची पदभरती यासह रिक्त जागांवर नव्या नियुक्ता कराव्या लागणार आहे. मध्यवर्ती कारागृहाच्या सात अधीक्षक पदांसाठी पात्र १२ जणांचे अर्ज मागविले आहे. एकंदरीत प्रलंबित फाईलींचा निपटारा शाम तागडे यांना येत्या तीन महिन्यात करावा लागणार आहे. त्यांच्यासाठी पुढील तीन महिने चॅलेजिंग असणार आहे.