अमरावती : जिल्ह्यात लसीच्या साठ्याअभावी रखडलेले लसीकरण सोमवारी किमान १०० केंद्रांवर सुरू होत आहे. रविवारी कोविशिल्डचे १७,०५० डोस प्राप्त झाले. यात ४५ ते वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला व प्राधान्याने दुसरा डोस देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
जिल्ह्यात लसींचा साठा संपल्यामुळे दोन दिवसांपासून सर्व केंद्रांवर लसीकरणाची प्रक्रिया ठप्प होती. मात्र, रविवारी डोस प्राप्त होताच आरोग्य विभागाद्वारा नियोजन करण्यात आले. त्यानुसार प्रत्येक तालुक्याला ७०० ते ८०० डोज देण्यात आल्याची माहिती लसीकरणाचे समन्वयक करंजीकर यांनी दिली.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. पाच टप्प्यांत ही प्रक्रिया होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४,१६,७२० डोस प्राप्त झाले आहेत. यामध्ये ३,३५,७३० कोविशिल्ड व ८०,९९० डोस कोव्हॅक्सिनचे प्राप्त झाले आहेत. यामध्ये आतापर्यंत ३ लाख ९७ हजार ९८६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. शनिवारी एक-दोन केंद्रांवरच लसीकरण सुरू होते. यामध्ये १८४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २४ हजार ४१७ नागरिकांनी कोविशिल्ड व ७३ हजार ५६९ नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतल्याची नोंद झालेली आहे. यामध्ये ३१ हजार ४३९ हेल्थ केअर वर्कर, ३५ हजार १८ फ्रंट लाईन वर्कर, १८ हजार ३६० तरुणाई (१८ ते ४४ वयोगट), १ लाख ३१ हजार, १०८ नागरिक ४५ ते ५९ वयोगटातील व १ लाख ३१ हजार १०८ ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतक्याची माहिती सूत्रांनी दिली.
बॉक्स
कोविन ॲपमध्ये दुरुस्ती
कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस आता ८४ दिवसांनंतर देण्यात येणार आहे. याबाबत कोविन ॲपमध्ये आवश्यक ती दुरुस्ती शासनस्तरावर करण्यात आलेली आहे. या दिवसांअगोदर दुसरा डोस देण्यात येणार नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी सांगितले. सोमवारी याच प्रक्रियेत लसीकरण होत असल्याचे ते म्हणाले.
पाईंटर
आतापर्यंत लसीकरण : ३,९७,९८६
कोविशिल्डचे लसीकरण : ३,२४,४१७
कोव्हॅक्सिनचे लसीकरण : ७३,५६९
प्राप्त एकूण डोस : ४,१६,७२०
कोविशिल्ड डोस : ३,९९,६७०
कोव्हॅक्सिनचे डोस : ८०,९९०