अमरावती : कोरोना लसीकरणाच्या शुभारंभाला दिवशीच्या म्हणजेच १६ जानेवारीच्या सत्रात प्रत्येक केंद्रावर शंभर जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यातील उर्वरित लसीकरण त्यानंतर घेण्यात येतील. यासाठी नोंदणी आवश्यक असल्याने या कामाला गती देण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी दिले. सर्व यंत्रणांद्वारे समन्वय ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
पूर्वतयारीसाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रशांत थोरात, पीडीएमसीचे वैद्यकीय अधिष्ठाता ए.टी. देशमुख, शिक्षणाधिकारी ई. झेड. खान, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. एस.आर. ठोसर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल रोहणकर व आरोग्य खात्याचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना प्रथम टप्प्यात लस दिली जाईल. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणांकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. लसीकरणासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. त्यानुसार कोविन ॲपबाबत तंत्र प्रशिक्षण डेटा एन्ट्री ऑपरेटरकडून घेतले जात आहे. लसीकरणासाठी आवश्यक पथकांनाही प्रशिक्षण देण्यात आले असून, यापूर्वी ड्राय रनदेखील घेण्यात आला. केंद्रावर आवश्यक आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांची पथके उपस्थित राहतील, अशी माहिती सीएस श्यामसुंदर निकम यांनी सांगितले.
बॉक्स
कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन लसींचा समावेश
कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन मान्यताप्राप्त लसींचा लसीकरण मोहिमेत समावेश आहे. लसीकरण हे अनिवार्य नाही, ते ऐच्छिक आहे. कोरोनाबाधित आणि सध्या लक्षणे व ॲक्टिव्ह रुग्ण असलेल्यांना ही लस देता येत नाही. ॲक्टिव्ह रुग्णाची लक्षणे गेल्यानंतर १४ दिवसांनी त्याला लस देता येते, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. ठोसर यांनी दिली.
बॉक्स
या केंद्रात लसीकरण
लसीकरणाच्या शुभारंभामध्ये जिल्हा रुग्णालय, अचलपूर, मोर्शी व दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालये, तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, हायटेक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व व्हीवायडब्ल्यूएस डेंटल कॉलेज अशी केंद्रे आहेत. लसीकरण चार टप्प्यात होणार असून, पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्करचे लसीकरण होणार आहे.
बॉक्स
दुसऱ्या टप्यात फ्रंटलाईन वर्कर
लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर (गृह, महसूल, होमगार्ड संबंधित अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी), तिसऱ्या टप्प्यात हायरिस्क व्यक्ती व ५० वर्षावरील व्यक्ती व चौथ्या टप्प्यात उर्वरित सर्व व्यक्तींचे लसीकरण होणार आहे. जिल्ह्यात सुमारे १६ हजार २६२ हेल्थ केअर वर्करचे लसीकरण अपेक्षित आहे.