अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी आवश्यकता लक्षात घेऊन ठिकाणे व मनुष्यबळाबाबत परिपूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देश टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी दिले. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १६,२३२ व्यक्तींना ही लस देण्यात येणार आहे.
कोरोना प्रतिबंध लसीकरणाचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे. त्यांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक पद्माकर सोमवंशी यांच्यासह आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
लसीकरणासाठी आवश्यक साधनसामग्री व मनुष्यबळ आदी यंत्रणेबाबत अचूक माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवाल यांनी दिले. लसीकरणासाठी आरोग्य मंत्रालयाने निश्चित करून दिलेल्या निकषांनुसार लसीकरण स्थळाची रचना असणे आवश्यक आहे. कोरोना दक्षतेच्या अनुषंगाने सर्व साधने त्याठिकाणी उपलब्ध असावीत. शासकीय व खासगी आरोग्य यंत्रणेतील हेल्थ केअर वर्करचे लसीकरण सुरुवातीच्या टप्प्यात होईल. त्यांची सर्व माहिती तत्काळ संबंधित पोर्टलवर अपलोड करावी. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, अमरावती महापालिका, वैद्यकीय महाविद्यालये यांसह खासगी रुग्णालयांमधील वर्करचा डेटा अचूक भरला जावा, असे निर्देश त्यांनी दिले.
बॉक्स
पहिल्या लसीनंतर महिन्याभराने दुसरा डोस
आरोग्य यंत्रणा व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी कुशल मनुष्यबळ नेमून पथके तयार करावीत. त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. कोरोना प्रतिबंधक दोन लसींचा डोस आहे. पहिली लस टोचल्यानंतर एक महिन्याने दुसरी लस टोचली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्करला लस टोचली जाणार आहे. शासकीय, निमशासकीय आरोग्य यंत्रणा, खासगी आरोग्य यंत्रणेकडील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण होणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
बॉक्स
लसीकरणाचे टप्पे
* हेल्थ केअर वर्कर
* फ्रंटलाईन वर्कर
* हायरिस्क, ५० वर्षावरील व्यक्ती
* उर्वरित सर्व व्यक्ती