अमरावती : जिल्ह्यात ४५ वर्षांवरील किमान २.६६ लाख नागरिकांचे लसीकरण गुरुवारपासून सुरू होत आहे. यासाठी जिल्ह्यात युद्धस्तरावर तयारी सुरू आहे. सद्यस्थितीत सुरू असलेल्या केंद्रावरच हे लसीकरण करण्यात येणार आहे. नंतर काही केंद्र नव्याने सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी लसीचे ३५ हजार व्हायल बुधवारी प्राप्त होणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. जिल्ह्यात ४५ वर्षांवरील ११,५६,८४४ नागरिक आहेत. यात ६० वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण यापूर्वीच सुरू झाले, तर सहव्याधी असणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण सुरू झालेले आहे. आता ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांचे लसीकरण बुधवारपासून जिल्ह्यात सुरू होत आहे. यासाठी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेद्रांत लसीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणेजवळ मनुष्यबळाचा अभाव नाही. मात्र, डाटा एंट्री करणाऱ्यांची संख्या कमी आहे व यासाठीचे नियोजन केले जात असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात कोविशिल्डचे १,१३,२०० व कोव्हॅक्सिनचे ३३,८६० डोस प्राप्त झालेले आहे. किमान ३५ हजार व्हायल बुधवारी रात्री प्राप्त होणार आहेत.
बॉक्स
जिल्ह्यात १,२८,७५४ जणांचे आतापर्यंत लसीकरण
जिल्ह्यात आतापर्यंत १,२८,७५४ जणांचे लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. यात हेल्थ केेअर वर्कर २६,२७८, फ्रंट लाईन वर्कर २०,९६३, ४५ ते ५९ वर्षांचे दरम्यान असलेले १०,९५३ सहव्याधी रुग्ण व ६० वर्षांवरील ७०,५६० नागरिकांचा समावेश आहे. नवीन ड्राईव्हमध्ये रोज किमान १५ हजार नागरिकांच्या लसीकरणाचे लक्ष्यांक राहणार असल्याचे आरोग्य विभागाद्वारा सांगण्यात आले.
बॉक्स
लसीकरणासाठी पात्र वयोगटनिहाय नागरिक
जिल्ह्यातील किमान ११,५६,८४४ नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. यात ४५ ते ५९ वयोगटात २,६६,४८५, व ६० वर्षांवरील ८,९०,३५९ नागरिकांचा समावेश आहे. वयोगटानुसार ६० ते ६९ वयोगटात २,४७,७१९, ७० ते ७९ वयोगटात १,४५,५८६, ८० ते ८९ वयोगटात ७४,३९३, ९० ते ९९ वर्षवयोगटात १६,५५४ व १०० प्लसमध्ये २,२६५ नागरिक आहेत. यापैकी ८३,५१३ नागरिकांनी यापूर्वीच लस घेतल्याची माहिती आहे.