अमरावती : देशात १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण महाराष्ट्र दिनापासून सुरू होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांना लस मिळणे आवश्यक आहे. मात्र, त्यांच्यासाठी लसीकरणाची सुविधा महाविद्यालयांतच करावी, अशी मागणी सिनेट सदस्य मनीष गवई यांनी केली. राज्यपाल, कुलगुरूंना या मागणीचे निवेदन पाठविण्यात आले.
काेरोना संसर्गामुळे विद्यार्थी घरीच आहेत. सर्व परीक्षा घेत असताना एकही विद्यार्थी कोरोनाबाधित होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात यावी. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालायाताच लसीकरण सुविधा उपलब्ध करून द्यावी. त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय महाविद्यालय उघडू नये. लसीकरण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे मानसिक समुपदेशनदेखील महाविद्यालयाच्या मानसिक समुपदेशन केंद्राच्यावतीने करण्यात यावे, अशी मागणी मनीष गवई यांनी केली आहे. लसीकरणासाठी एनएसएस व एनसीसीचे सहकार्य घ्यावे तसेच महाविद्यालय प्रशासन व सर्व प्राचार्यानी या मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहनसुद्धा त्यांनी केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयांमध्ये हजारोंच्या संखेने एनएसएस व एनसीसीचे स्वयंसेवक नोदणीकृत असून, मनुष्यबळासाठी त्यांचे सहकार्य घ्यावे. याबाबत गवई हे एनएसएसचे राज्य संपर्कप्रमुख व एनसीसीच्या महासंचालकांना पत्राद्वारे विनंती करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.