अमरावती : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. यात महापालिकेच्या फ्रंट लाईन वर्करना लस देण्यात येत आहे. आयुक्त प्रशांत रोडे यांनी दंत महाविद्यालयात लस टोचून घेतली. यादरम्यान आरोग्य यंत्रणेने या कोरोनाकाळात बजावलेली भूमिका महत्त्वपूर्ण असून, ‘फ्रंट लाईन वर्कर’ असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाची लस आली म्हणून नागरिक बेफिकीर झाले आहेत. त्यामुळे आता अधिक सजग राहावे लागेल, असे आयुक्त रोडे म्हणाले. नियमित मास्कचा वापर करावा. वारंवार हात धुवावे तसेच सुरक्षित अंतर ठेवावे. महापालिका क्षेत्रात रुग्णांची संख्या वाढत असून, प्रत्येक नागरिकाने दक्ष राहून त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. शासकीय तसेच खासगी वैद्यकीय क्षेत्रातील 'फ्रंटलाइन वर्कर्स'नी पुढाकार घेऊन कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी आणि लसीकरण मोहीम पुढच्या टप्प्यात जाऊन सर्वांना लसीकरण होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, मास्क वापर व दक्षतेबाबत जोरदार मोहीम राबविण्याचे निर्देश आयुक्त रोडे यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार जनजागृतीसाठी सोमवारपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
००००००००००
आयसोलेशन, गृह विलगिकरणातील रुग्णांची नोंदणी आवश्यक
महापालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, आयुक्त रोडे यांनी कोरोना नियंत्रण व प्रतिबंधक उपाययोजनांसाठी रविवारी सूचना जारी केल्या आहेत. होम आयसोलेशन तसेच खासगी दवाखाने, शासकीय रुग्णालयातील रुग्ण, गृह विलगीकरणामध्ये ठेवत असताना रुग्णांचे मोबाईल क्रमांक, रुग्णांचा पत्ता व नोंदणी करणे आवश्यक केले आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णांचे नोंदणी वेबसाईटवर करावे लागेल. सदर वेबसाईट मोबाईलद्वारे नियंत्रित करता येणार आहे.
०००००००००००
कोराेनाग्रस्तांवर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य पथक
कोरोना संक्रमित अथवा लक्षणे असलेल्या रुग्णांची नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले आहे. परिणामी हे रुग्ण नेमके कुठे आहेत, यावर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवणार आहे. याकरिता शहरात पाचही झोननिहाय आरोग्य पथक गठित करण्यात आले आहे. यात झोन क्रमांक १ रामपुरी कॅम्पचे स्वास्थ्य निरीक्षक शेख यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालय, झोन क्रमांक २ राजापेठ येथील स्वास्थ्य निरीक्षक व्ही.एस. भुरे यांच्याकडे राजकमल चौक, झोन क्रमांक ३ दस्तुरनगर येथील स्वास्थ्य निरीक्षक के.आर. हडाले यांच्याकडे मध्यवर्ती बस स्थानक, झोन क्रमांक ४ बडनेरा येथील स्वास्थ्य निरीक्षक ढिक्याव हे नवाथे चौक, तर झोन क्रमांक ५ भाजीबाजार येथील स्वास्थ्य निरीक्षक व्ही.डी. जेधे यांच्याकडे चित्रा चौकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.