अमरावती : कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागात लाेकसंपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यासाठी नियोजन करून लसीकरणाची प्रक्रिया टप्प्यप्प्प्याने विशेष शिबिराच्या माध्यमातून राबविण्याचे निर्देश शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा परिषद स्थायी समितीची ऑनलाईन सभा अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेत त्यांच्या दालनात पार पडली. यावेळी सभेला उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सुरेश निमकर, दयाराम काळे, पूजा आमले, सदस्य जयंत देशमुख, सुनील डिके आदी उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र, ग्रामीण जनतेच्या दैनंदिन संपर्कात येत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये गॅस वितरक, पेट्रोल पंपावरील कर्मचारी, खरीप हंगाम तोंडावर असल्याने कृषी सेवा केंद्र चालक यांच्याही शेतकऱ्यांसोबत संपर्क येतो. त्यामुळे या लोकांना आगामी कालावधीत प्राधान्याने लसीकरण करावे, असा मुद्दा सदस्य जयंत देशमुख यांनी मांडला. यावर अध्यक्षांनी संबंधित यंत्रणेकडून नावनिहाय व तालुकानिहाय यादी मागविली आहे. त्यानुसार नियोजन करावे व जसजशी लस उपलब्ध होईल त्याप्रमाणे विशेष शिबिर घेऊन लसीकरण करावे. कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता व नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांसोबत जवळचा संबंध येत असल्याने शिक्षकांचे लसीकरण तालुकानिहाय नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांना दिल्या आहे. सभेला समिती सदस्य व सीईओ अविश्यांत पंडा, डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे व अन्य खाते प्रमुखांनी ऑनलाईन हजेरी लावली.
बॉक्स
ऑनलाईन वेतनासाठी अभ्यास समिती
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचा वेतन ऑफलाईन होत असल्याने दरमहिन्याला अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सीएमपी प्रणालीव्दारे ऑनलाईन वेतनाची प्रक्रिया ज्या जिल्ह्यात सुरू आहे, तेथील प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण सभापती सुरेश निमकर यांच्या अध्यक्षतेत कॅफो, प्राथमिक शिक्षणाधिकारी व अन्य दोन सदस्य असे पाच सदस्यीय समिती स्थापनेचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला. ही समिती लवकचर अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे.
बाॅक्स
कोविड केअर सेंटरसाठी एक महिन्याचे मानधन
जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरच्या निर्णयाबद्दल स्थायी समिती सदस्या सुहासिनी ढेपे यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडून अध्यक्षांचे आभार मानले. यावेळी जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांनीही कोविड सेंटरला एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.