अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. अमरावती शहर, जिल्ह्यातही लसीकरण केंद्र साकारण्यात आले आहेत. मात्र, लसीकरण करून घेण्याबाबत नागरिकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. नव्या वर्षात १६ जानेवारीपासून ही मोहीम सुरू झाली असली तरी ७५ दिवसांत जिल्ह्यात १ लाख ३९ हजार ३९८ जणांनी लस घेतल्याची नोंद झालेली आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख असून, त्यातुलनेत लसीकरणाची टक्केवारी ही ५ टक्के एवढी आहे.
महापालिका परिसरात कोरोना रूग्णसंख्येचा विळखा अधिक घट्ट होत आहे. तसेच ग्रामीण भागात अचलपूर, तिवसा, चांदूर बाजार, वरूड, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, धामणगाव रेल्वे तालुक्यांत कोरोना संक्रमितांची नोंद आरोग्य यंत्रणेने घेतली आहे. दररोज २५० ते ४०० च्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. दरदिवशी कोरोनाने चार ते १० रुग्णांचा मृत्यू होत आहे. गंभीर रुग्णसंख्या दुसऱ्या लाटेत कमी होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, लसीकरणाबाबत प्रचंड उदासीनता असल्याचे वास्तव आहे. काही जणांना कोरोना प्रतिबंधत लस घेतल्यानंतरही कोरोना संक्रमण झाल्याने या लसीबाबत समज- गैरसमज असल्याबाबतची चर्चा ऐकावयास मिळत आहे. परंतु, आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन ४५ वर्षांवरील नागरिक, सहव्याधी असलेल्यांनी लस घ्यावी, अशी जनजागृती केली जात आहे. यासाठी शासकीय आणि खासगी अशी ७३ केंद्र निर्माण केली आहेत. शासकीय रुग्णालयात लसीकरणाचा वेग वाढला आहे. मात्र, खासगीत वेग कमी असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये अद्यापही लसीकरणाबाबत संभ्रम कायम आहे.
----------------
लसींचा शिल्लक साठा
काेविशिल्ड : ३५ हजार
कोव्हॅक्सिन : ३ हजार
-----------
४५ वर्षांवरील नागरिक (पहिला डाेस)
आरोग्य सेवक : १७,२३५
फ्रंट लाईन वर्कर : १५,९०७
ज्येष्ठ नागरिक : ७६,४३२
४५ वर्षावरील सहव्याधी : १४,१२७
एकूण : १,२३,७०१
------------
दुसरा डोस
आरोग्य सेवक : ९,५२६
फ्रंट लाईन वर्कर : ५,९३७
ज्येष्ठ नागरिक : १७३
४५ वर्षांवरील सहव्याधी : ६१
एकूण : १५,६९७
---------------
जिल्ह्यात सात लाखांच्यावर लस देण्याचे आव्हान
पहिल्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सहव्याधी असणाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. २ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. त्याची नोंदणी सुरू झाली आहे. अमरावती महापालिका परिसर आणि ग्रामीण भागात असे सात लाखांवर नागरिक असून, सरसकट लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण केंद्रावर ताण वाढणार असला तरी लसींचा साठा पुरेसा असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
------------------
कोरोनाचा ज्येष्ठांना अधिक धोका असल्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण हाच एकमात्र उपाय आहे. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्यांना लस देण्याबाबतचे नियोजन चालविले आहे. साडेचार लाख लसींची मागणी केली आहे. लसींचा साठादेखील उपलब्ध झाला आहे.
-दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती