अमरावती : जिल्ह्यात दोन दिवसांपासून दोन्ही लसींचा स्टॉक संपल्याने ९० वर केंद्र बंद आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी प्रमुख उपाययोजनाच थांबल्याने जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कसा रोखणार, असा नागरिकांचा सवाल लोकमतने केलेल्या रिॲलिटी चेक दरम्यान उपस्थित केला.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये लसीकरण ही सर्वात प्रभावी उपाययोजना मानली जाते. जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या पूर्वी १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले व या सात महिन्यात पाच टप्प्यात लसीकरण सध्या होत आहे. मात्र, लसीकरणाच्या ‘कोविशिल्ड’ व ‘कोव्हक्सिन’ या लसींचा नियमित पुरवठा होत नसल्याने मोहिमेचा विचका होत आहे.
जिल्ह्यात गुरुवारी कोविशिल्डचे ३८०० व कोव्हक्सिनचे २०० डोस शिल्लक असल्याने गुरुवारी बहुतांश केंद्र बंद होती. याशिवाय जी केंद्र सुरू होती, त्या केंद्रावरील स्टॉकदेखील तासाभरात संपल्याने. जिल्ह्यात लसीचा ठणठणात झाला व लसीकरण मोहीमच ठप्प झाली. यासंर्दभात आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता त्यांनीदेखील जिल्ह्यातील लसीकरण केंद्र बंद असल्याचे सांगितले.
जिल्ह्यात गुरुवारी ५,००८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये ३,१४० नागरिकांनी पहिला व १,८६८ नागरिकांनी दुसरा डोस देण्यात आलेला आहे. आरोग्य विभागाचे अहवालानुसार गुरुवारपर्यंत ६,८९,१०५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यात ५,१६,४९८ नागरिकांनी पहिला व १,७२,६०७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर झालेले लसीकरण अत्यंत तोकडे आहे.
बॉक्स
३,४३,८९१ नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा
जिल्ह्यात आतापर्यंत ५,१६,४९८ नागरिकांनी पहिला डोस घेतला. त्यातुलनेत १,७२,६०७ नागरिकांनीच दुसरा डोस घेतल्यामुळे ३,४३,८९१ नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद वाढता असताना केंद्रांची संख्या कमी असल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी व रांगा लसीकरण केंद्रांवर पहाटेपासून दिसून येतात.
बॉक्स
आतापर्यंत ६,७६,५४० डोस प्राप्त
जिल्ह्यास आतापर्यंत ६,७६,५४० डोस प्राप्त झाल्याचे सांगण्या. आले. यात सर्वाधिक ५,२५,५३० कोविशिल्ड व १,५०,७१० कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. शुक्रवारी लस मिळेल, अशी शक्यता नाही. आरोग्य उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधला असता, शुक्रवारी दुपारनंतर जिल्ह्यात काही डोस प्राप्त होणार असल्याचे सांगण्या. आले.
बॉक्स
शहरातील केंद्रांवर लागले बंदचे बोर्ड
ग्रामीण भागात गुरुवारी काही केंद्र सुरु असले तरी महापालिका क्षेत्रातील सर्वच केंद्र बंद असल्याचे दिसून आले. एकूण लसींच्या पुरवठ्याची स्थिती पाहता किमान तीन दिवस केंद्र बंद राहत आहे व रविवारी शहरातील केंद्र सुरू होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. नागरिकांना याची माहिती नसल्याने अनेकांना माघारी परतावे लागले.
कोट
जिल्ह्यात गुरुवारपासून लसींचा तुटवडा आहे. थोडेबहुत डोस शिल्लक असल्याने शुक्रवारी ग्रामीणमधील काही केंद्र सुरू होते. मात्र, स्टॉक संपल्यानंतर तेही बंद पडले. लसीच्या पुरवठ्याबाबत निश्चित सांगता येत नाही.
- डॉ दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी
पाईंटर
आतापर्यंत लसीकरण : ६८९१०५
पहिला डोस : ५,१६,४९८
दुसरा डोस : १,७२,६०७
-----------
आता प्राप्त डोस : ६,७६,५४०
कोविशिल्ड : ५,२५,८३०
कोव्हॅक्सिन : १,५०,७१०