अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत जात आहे. अशातच लसीचा तुटवड्यामुळे नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता लसीकरणासाठी आरोग्य विभागाला तडजोड करावी लागत आहे. लसीचा कमी वापर तसेच कमी मागणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील लस परत बोलावून सदर लसीचा साठा हा ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गर्दी आहे, अशा ठिकाणी पाठविण्यात येत आहेत.
जिल्ह्यात लोणी, धामक, नांदगाव खंडेश्वर पापळ यासह इतर काही आरोग्य केंद्रांतून लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद कमी असल्याने येथील लसी परत करण्यात आल्याच्या मुद्द्यावर जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्यांनी आक्षेप घेतला होता. मात्र, आरोग्य विभागाला लसीची पर्यायी व्यवस्थेसाठी तडजोड करावी लागत असल्याचे वास्तव आहे. वरील काही आरोग्य केंद्रांना त्यानुसार लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, तिचे लसीकरण अतिशय संथ गतीने सुरू आहे. नागरिकांमध्ये लसीबाबत अद्याप तत्परता झालेली दिसून येत नाही. अनेक आरोग्य केंद्रांमध्ये लसीसाठी रांगा लागलेल्या आहेत. हे विपरीत चित्र सध्या जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. अनेक आरोग्य केंद्रावर नागरिक रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. मात्र काही ठिकाणी लस असूनसुद्धा उपयोगात येत नसल्याचे आरोग्य विभागाने पर्यायी व्यवस्था करून लसीकरणावर भर दिला आहे.
कोट
काही प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीची अतिशय कमी मागणी आहे. मात्र, जेथे लसीचा साठा आहे त्या आरोग्य केंद्रातून लसी परत बोलावून ज्या केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागत आहे तेथे पाठविण्यात येत आहे. लस संपल्यास राज्य शासनाला पुन्हा साठा पाठविला जातो. त्यामुळे काही आरोग्य केंद्रातून पर्यायी व्यवस्थेचा हा एक भाग आहे.
- दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी