नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील लोणी, पापळ, मंगरूळ चव्हाळा, नांदगाव खंडेश्वर या लसीकरण केंद्रावर पुरवठा करण्यात आलेल्या लसी अवघ्या दोन दिवसातच संपल्या. आता या केंद्रावर लसीची उपलब्ध नसल्याने लसीकरणाचे काम रखडले आहे. ६ मे रोजी ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसऱ्या डोससाठी लोणी केंद्रावर २००, पापळ केंद्रावर २००, मंगरूळ चव्हाळा केंद्रावर १५० कोविशिल्ड लसीचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र, अवघ्या दोनच दिवसांतच येथील साठा संपला.
तसेच सातरगाव व धामक केंद्रावर लसीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या दोन्ही केंद्रावर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाच्या पहिल्या डोससाठी सातरगाव केंद्रावर ६ मे रोजी ४०० कोव्हॅक्सिन व धामक केंद्रावर २०० कोव्हॅक्सिन डोसचा पुरवठा झाला होता. कोरोनाच्या प्रकोपात लसीकरण हे प्रभावी माध्यम ठरत असल्याने तालुक्यातील नागरिकांचा लसीकरणाकडे कल दिसून आला. लसीकरण केंद्रावर लसीचा पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.