तिघांना साश्रुनयनांनी निरोपसंदीप मानकर/अनंत बोबडे वडनेरगंगाईबोर्डा नदीच्या पात्रातील डोहात बुडून शनिवारी वडनेरगंगाई येथील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. रविवारी तिघांचीही सामूहिक अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रेत तालुक्यातून जनसागर लोटला. या घटनेमुळे अख्खे गाव शोकसागरात बुडाले.विद्यार्थ्यांचे मृतदेह रात्री उशिरा येथीलच पोहणाऱ्या कार्यकर्त्यांनी महसूल विभागाच्या मदतीने बाहेर काढले. रविवारी सकाळी दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात तीनही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. नंतर मृतदेह ट्रॅक्टरने गावात आणले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. जेव्हा विद्यार्थ्यांची सामूहिक अंत्ययात्रा निघाली तेव्हा अख्खे गाव ढसाढसा रडले. तिरडी उचलताच त्यांच्या आप्तस्वकीयांनी रडण्याचा हंबर्डा फोडला. घटना बघून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. या तीनही विद्यार्थ्यांना गावाबाहेर असलेल्या दर्यापूर मार्गाजवळील स्मशानभूमित माती देण्यात आली. त्यांच्या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. गावातून ज्या मार्गावरुन अंत्यायात्रा गेली, त्या मार्गावरील महिलांनी अश्रुंना वाट मोकळा करुन दिला.आकोट येथील भाऊसाहेब पोटे कृषी विद्यालयात दहावीत शिकणारा हृतिक नीळकंठ जोध (१६), वडनेरगंगाई येथे दादासाहेब हुतके ज्यु. कॉलेज येथे अकरावीत शिकणारा आकाश देवीदास इंगळे (१७) तसेच विकास विद्यालय वडनेरगंगाईचा दहावीचा विद्यार्थी आकाश कैलास हिवराळे या तीनही विद्यार्थ्यांवर शनिवारी काळाने घाला घातल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. हे तिघेही विद्यार्थी जीवलगत मित्र होते. शनिवारची शाळा सकाळची असल्याने शाळा संपल्यानंतर विद्यार्थी आपआपल्या घरी आले. त्यानंतर हे पोहायला गेले होते.
वडनेरगंगाईत आक्रोश : आठवणींनी गहिवरले गाव, सामूहिक अंत्ययात्रा
By admin | Published: August 24, 2015 12:24 AM